Special Report: जयकुचीवाडी ते जायकवाडी, मराठवाड्याचा ‘समुद्र’ ते आशिया खंडातलं सर्वात मोठं धरण, वाचा सविस्तर
औरंगाबाद: आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण (Jayakwadi dam, Aurangabad) यावर्षी तब्बल 95 टक्के भरलं आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं मात्र दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात (Marathwada And Aurangabad) उत्साहचं वातावरण आहे. असं म्हणतात की, हे धरण […]
औरंगाबाद: आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण (Jayakwadi dam, Aurangabad) यावर्षी तब्बल 95 टक्के भरलं आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं मात्र दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात (Marathwada And Aurangabad) उत्साहचं वातावरण आहे. असं म्हणतात की, हे धरण एकदा जर पूर्ण भरलं तर 2 वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. यामुळे तर या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
धरणाचे जायकवाडी हे नाव कसे पडले?
या धरणाचा आराखडा सर्वात पहिल्यांदा जुन्या हैदराबाद राज्याने तयार केला होता. तत्कालीन बीड जिल्ह्यातील ‘जयकुचीवाडी’ या खेड्याजवळ गोदावरी नदीवर 2,147 दशलक्ष घनमीटर जलसाठा असलेलं धरण बांधण्याची योजना होती. अर्थातच जयकुचीवाडी या खेड्याच्या नावावरून प्रकल्पाला जायकवाडी हे नाव देण्यात आलं. पुढे राज्य पुनर्रचनेनंतर आणि विविध पर्यायी जागांचा अभ्यास केल्यानंतर हे धरण जयकुचीवाडीऐवजी वरील बाजूस असलेल्या पैठण येथे बांधायचे निश्चित झाले. ठिकाण बदलले तरीही प्रकल्पाचे नाव तेच ठेवण्यात आले. हे धरण बांधण्यासंबंधीचा प्रकल्प अहवाल 1964 मध्ये पूर्ण झाला.
धरण बांधण्यामागील हेतू काय?
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागातील शेतीसाठी जमीन बागायती करणे हा धरण बांधण्यामागील मुख्य हेतू होता. तसेच जवळपासची शहरे आणि खेड्यांना, औरंगाबाद व जालना नगरपालिका व औद्योगिक क्षेत्राला पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणे हाही उद्देश होता.
अन् अस्तित्वात आले मातीचे सर्वात मोठे धरण!
जायकवाडी धरण महाराष्ट्रात माती कामाच्या बाबतीतही अग्रेसर आहे. धरणाच्या बांधकामात आधी गोदावरी नदीच्या पात्रात 615 मी. लांबीचे तर दोन्ही तीरांवर 9,600 मी. लांबीचे मातीचे बांध पसरण्यात आले. दगडी धरणामध्ये 417 मी. लांबीचा सांडवा आणि 34 मी. लांबीचा पॉवर ब्लॉक आहे. एकूण 9,600 मी. लांबीच्या मातीच्या धरणाकरिता 128.5 लक्ष घ. मी. मातीकाम व 4 लक्ष घ.मी. दगडी झुकाव भरावा लागला. मातीच्या धरणाच्या कामास 1965 मध्ये प्रारंभ होऊन 1973 साली ते पूर्ण झाले. या कामातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रसामग्रीतून व खात्यामार्फत करण्यात आले. यामुळे एकूण काम वेळेवर पूर्ण होऊन उच्च प्रतीची गुणवत्ताही साधण्यात आली. मे 1074 पर्यंत धरणाच्या मुख्य भिंतीचे काम माथ्यापर्यंत बांधून झाले त्यानंतर काँक्रीट खांब पूर्ण करणे, त्यांवर पूल बांधणे व 27 दरवाजांची उभारणी ही कामेही दोन वर्षांत खात्यामार्फतच पूर्ण झाली.
शास्त्रीजींनी पाया रचला तर उद्घाटन इंदिराजींनी केले
जायकवाडी धरणाचा पाया तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी 18 ऑक्टोबर 1965 रोजी घातला होता. धरणाच्या उद्घाटनाचे काम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 24 फेब्रुवारी 1976 रोजी केले होते.
धरणाचा 80% पाणीसाठी सिंचनासाठी
धरणातील 80% पाणी सिंचनासाठी, 5-7% पिण्याच्या पाण्यासाठी आणि उर्वरित औद्योगिक कामांसाठी दिले गेले आहे. धरणातून सरासरी दररोज सुमारे 1.36 एमसीएम स्त्राव होत असून त्यापैकी 0.05 एमसीएम पाणी एमआयडीसी क्षेत्राला दिले जाते, तर औरंगाबादच्या गरजा भागविण्यासाठी 0.55 एमसीएम वाटप केले जाते, तर उर्वरित रक्कम बाष्पीभवनात हरवते.
धरणाची कोणती वैशिष्ट्ये?
– आशियातील मातीच्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक – उंची अंदाजे 41.30 मीटर – लांबी 99.99 किमी – एकूण साठवण क्षमता 2,909 एमसीएम (दशलक्ष घनमीटर) आणि प्रभावी राहणीमान क्षमता 2,171 एमसीएम आहे. – धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 21,750 किमी 2 आहे. – दरवाजे- धरणासाठी एकूण 27 पाण्याचे दरवाजे आहेत. – जायकवाडी धरणाला नाथसागर धरण असेही म्हणतात.
नाथसागरातून मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना
– जायकवाडी धरणासाठी बांधलेल्या जलाशयाचे नाव नाथसागर जलशाय असे आहे . गोदावरी व प्रवरा नद्यांनी भरलेला हा जलाशय सुमारे 55 कि.मी. लांबीचा आणि 27 कि.मी. रुंद असून 350 कि.मी.पर्यंत पसरलेला आहे. जलाशयांमुळे एकूण पाण्याचे पाण्याचे क्षेत्र अंदाजे 36,000 हेक्टर आहे.
– नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. – परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं
– जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.
– औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.
इतर बातम्या-