Aurangabad Corona: जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीच्या दिशेने, मागील चार दिवसातला आकडा चिंता वाढवणारा?
औरंगाबादेत मागील चार दिवसांतील कोरोना रुग्णसंख्येवर नजर टाकली असता ही आकडेवारी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी आहे.
औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढीच्या दिशेने वाटचाल करतानाचे चित्र आहे. मागील चार दिवसात शहरात तब्बल 59 रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात 17 रुग्णांची भर पडली. शनिवारी शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण औरंगाबादमध्ये 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर एका 65 वर्षीय महिलेचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोनाची मागील आठवडाभरातील आकडेवारी पाहता, तो पुन्हा शहरात हात-पाय पसरतोय, असेच चित्र आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेची चिंता वाढली आहे.
मागील चार दिवसातील रुग्ण संख्या
1 जानेवारी- शहर 16, ग्रामीण 10 31 डिसेंबर- शहर 14, ग्रामीण 4 30 डिसेंबर- शहर- 14- ग्रामीण- 2 29 डिसेंबर- शहर- 15- ग्रामीण 1
तिसऱ्या लाटेसाठी 143 केएल ऑक्सिजनची क्षमता
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता औरंगाबादमध्ये तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज केली जात आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता फेब्रुवारीत तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. शहरातील महापालिकेसह खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढवण्यात येत आहे. सध्या शहरात 143 के.एल. ऑक्सिजनची क्षमता असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दुसऱ्या लाटेत शहरातील ऑक्सिजन बेड पूर्णपणे फुल्ल झाले होते. रुग्ण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 10 ते 12 तास थांबत होते. त्यामुळे यावेळी मात्र अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. महापालिकेने मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे 2 ऑक्सिजन प्लांट उभारले तर पदमपुरा कोव्हिड सेंटर येथेही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. लहान मुलांसाठी गरवारे कंपनीच्या सहकार्याने ऑक्सिजन व्यवस्थेसह 125 बेडचे स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय उभे करण्यात आले आहे.
इतर बातम्या-