औरंगाबाद: राज्यभरात गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. हा खून करण्यासाठी आरोपीने वापरलेली शस्त्रे अखेर पोलिसांच्या हाती लागली आहेत. ही शस्त्रे आरोपीने जवळच्याच विहिरीत टाकल्याचे सांगितले होते. मात्र या विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा पाणी असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ही विहीर उपसण्याचे काम पोलिसांकडून सुरु होते. आता ही शस्त्रे सापडल्यानंतर पोलिसांनी या खून प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे राजन शिंदे हत्या प्रकरण?
सोमवार 11 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचा राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे खून झाला होता. हा खून कोणी केला, याचा तपास करण्यासाठी शिंदे यांचे निकटवर्तीय, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी, महाविद्यालयातील कर्मचारी अशा सर्वांची चौकशी करण्यात येत होती. एकाने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून ते शस्त्र घराजवळीलच विहिरीत टाकल्याचे सांगितले होते. ही विहीर अनेक वर्षांपासून पडीक असल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर कचरा आहे. त्यामुळे त्यात गॅसही असण्याची शक्यता होती. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघव, अजबसिंग जारावाल, मुकुंदवाडी पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी घटनास्थळी तळ ठोकून होते.
डॉ. शिंदे यांच्या घराजवळील विहिरीतील पाणी उपसा शनिवार 16 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजल्यापासून सुरु करण्यात आला होता. महापालिकेच्या मदतीने पाच एचपीचे दोन आणि दोन एचपीचे दोन अशा चार पंपांद्वारे पाणी उपसण्याचे काम सकाळपर्यंत सुरु होते. यात आणखी एक मोटार वाढवण्यात आली आहे. यासाठी आठ ते दहा कर्मचारी काम करत होते. संपूर्ण पाणी उपसल्याशिवाय शस्त्र सापडणार की नाही याची उत्सुकता सर्वांना लागली होती. आज अखेर या विहिरीतून शस्त्रे बाहेर निघाली.
इतर बातम्या-