पैठणः ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती, किरणोत्सवाचा देखणा सोहळा
पैठण तालुक्यातील आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आपेगाव येथील जीर्णोद्धार झालेल्या नव्या मंदिरात प्रथमच टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला.
पैठणः तालुक्यातील आपेगाव येथे गुरुवारी संत ज्ञानेश्वर माऊलींचा (Paithan Dyaneshwar Mauli) समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते, त्यामुळे माऊलींच्या मुखावर पडणारा किरणोत्सव अनुभवता येईल की नाही, अशी चिंता भाविकांना होती. मात्र दुपारी सूर्यदर्शन झाले आणि भाविकांमध्ये एकच आनंदाची लाट पसरली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 735 व्या संजीवन समाधी (Sanjeevan Samadhi Sohala) सोहळ्याची ज्ञानोबा माऊलींच्या गजरात भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गुरुवारी दुपारी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून कार्तिकी काल्याची सांगता झाली.
पहाटेपासून गोदातीरावर भाविकांचा समुदाय
आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात गुरुवारी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. वारऱ्यांनी सकाळपासूनच किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरात मिळेल तिथे जागा धरली होती. दुपारी ठिक 12.52 वाजता सूर्यदर्शन झाले आणि माऊलींच्या तेजोमय मूर्तीवर काही काळ सूर्यकिरणे पडली. माऊलींच्या दर्शनासाठी सूर्यदेवही आला. हा विलक्षण सोहळा भाविकांनी याचि देही याचि डोळा अनुभवला.
माऊलींच्या मंदिरात फुलांची आरास
ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळी काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. गोदा काठावर गुरुवारी भल्या पहाटेपासूनच भाविकांनी स्नान करत महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले. नंतर संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून कार्तिक काला सोहळ्याची सांगता करण्यात आली. या प्रसंगी विविध सामाजिक संघटना व ग्रामस्थांच्या मदतीने भाविकांसाठी चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मोफत सर्वरोग चिकित्सा व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
इतर बातम्या-