Aurangabad Top 5: आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, जाणून घ्या औरंगाबादच्या पाच महत्त्वाच्या बातम्या, मोजक्या शब्दात
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला.
मराठवाडा निजामांशी लढला तसे आपण कोविडशी लढूः मुख्यमंत्री
औरंगाबाद: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती (Marathwada Liberation Day) स्तंभावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मराठवाडा निजामाविरोधात ज्या प्रमाणे लढला, तसेच आपण कोरोनाविरोधात लढू’. निजामाच्या खुणा राहणार नाहीत, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. मुख्य सोहळ्यासह शहरातील अनेक विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील दौऱ्यात अनेक राजकीय पक्षांनीही आंदोलनाचे नियोजन केले आहे. मनसे, एमआयएम, मराठा क्रांती मोर्चा आदी संघटनांनी राज्य सरकारवर टीका करत आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. पैठण येथील संतपीठाचे उद्घाटनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.
पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण, खड्ड्यांचेही पॅचवर्क
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात विविध राजकीय संघटनांनी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिसांवरबी बंदोबस्ताचा ताण वाढला. गुरुवारी पोलिसांनी मंत्र्यांच्या नियोजित मार्गावर आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सहा तास बंदोबस्ताचे प्रात्यक्षिक केले. ज्या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला, त्यांच्या नेत्यांशी पोलिसांनी बोलणी केली. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी रात्री उशीरा धरपकड सुरु होती. दरम्यान, मुख्यमंत्री ज्या मार्गाने शहरातून जाणार त्या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले. अनेक ठिकाणी स्वच्छताही करण्यात आली. जिल्हा परिषद मैदानावर विविध कार्यक्रम असल्यामुळो औरंगपुरा रस्त्याचेही पॅचवर्क करण्यात आली.
बँकांच्या राष्ट्रीय परिषदेत मराठवाड्याच्या विकासावर भर
मराठवाड्यात एसबीएच आणि एसबीआय बँकेचे विलिनीकरण झाल्यानंतर बँकांच्या शाखा कमी झाल्या आहेत. त्यामुळे या परिसरात बँकिंगचे जाळे वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा वाढवण्याच्या सूचना केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राष्ट्रीय बँक परिषदेत दिल्या. तसेच मुद्रालोनबाबतच्या अनेक समस्या मराठवाड्याला विशेष करून भेडसावतात. येथील उद्योजकांसमोरील या अडचणी सोडवण्याच्या सूचनाही त्यांनी बँकांना दिल्या. देशातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची आणि वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक काल औरंगाबादेत पार पडली. यानिमित्ताने सामान्यांसाठीच्या विविध योजनांवर विचारमंथन करण्यात आले.
पोलिसांनीच केला हत्येच्या आरोपींचा सत्कार
पोलिसांच्या प्रतिमेसाठी अत्यंत लज्जास्पद कृत्य दौलताबाद पोलिस ठाण्यात झाल्याचे उघडकीस आले आहे. दौलताबाद पोलीस ठाण्यात गणपतीच्या दर्शनाला आलेल्या तीन आरोपींचा सत्कार पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ज्यांचा सत्कार केला, त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न यासारख्या घटनांचा आरोप आहे. पोलीस अधिकारी दिलीप बचाटे यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि प्रतिमा देऊन सत्कार केल्याचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
जिल्ह्यात गुरुवारी 19 कोरोना रुग्णांची वाढ, एक मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात मनपा हद्दीत 7 आणि ग्रामीण भागात 12 अशा 19 कोरोना रुग्णांची वाढ झाली. तसेच जिल्ह्यात काल उपचार घेऊन 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच मागील 24 तासात ग्रामीण भागात एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्हाभरात 225 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण रसंख्या 1 लाख 48 हजार 435 झाली आहे. दरम्यान काल पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये घाटी परिसरात एक, एमजीएम रुग्णालय परिसरात एक, शिवाजीनगर भागात एक आणि पारिजात नगरात चार रुग्णांचा समावेश आहे. तर ग्रामीम भागात औरंगाबादेत एक, गंगापूर 1, सिल्लोड 1, वैजापूर 5, पैठणमध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
इतर बातम्या-
Aurangabad Gold: आज सोनं-चांदी आणखी घसरलं, काय आहेत औरंगाबादमध्ये सोन्या-चांदीचे भाव? कधी वाढणार दर?