मित्रासाठी कोर्टाच्या कामाचे लपून छायाचित्रण, औरंगाबादेत दोन तरुणांवर गुन्हा
शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्याकडून दोन्हीही मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
औरंगाबादः जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत सुरु असलेल्या एका खटल्यात मोबाइलमध्ये न्यायालयीन कामकाजाचे छायाचित्रण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांवर वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. माजी नगरसेवक पुत्राच्या खटल्यात त्याच्या मित्रांनी हे छायाचित्रण करण्याचा घाट घातला असता ही बाब त्यांच्याच अंगलट आली.
बुधवारच्या सुनावणीदरम्यान छायाचित्रण
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. रामगडिया यांच्यासमोर बुधवारी सुनावणी सुरु होती. यावेळी निखिल कल्याण काळे (28, मुकुंदवाडी) आणि आदित्य गजानन पळसकर (21. सिडको) यांनी व्हिडिओ शुटिंग केले. बुधवारी दुपारी 2.45 ते 3.30 दरम्यान कोर्टात सुनावणी सुरु असताना निखिल काळे आणि आदित्य पळसकर यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये विनापरवानगी गुप्तपणे छायाचित्रण केले. शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी सहाय्यक फौजदार राजपाल जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.
मित्रासाठी केलेला गुन्हा महागात पडला
बुधवारी सुरु असलेल्या सुनावणीचे छायाचित्रण या दोघांनी आपल्या मित्रासाठी केल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात एका माजी नगरसेवकाच्या मुलाविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात माजी नगरसेवक पुत्राला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जावर सुनावणी घेण्यात येत असताना त्याच्या दोन मित्रांनी हे चित्रीकरण केले. मात्र ते चांगलेच महागात पडले.
दोघांचे मोबाइल जप्त
या दोन्ही आरोपींकडून 45 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आवारात मोबाइल बंद ठेवण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत. मोबाइल वाजल्यास दंडही आकारला जातो. असे असतानाही या तरुणांनी थेट चित्रीकरण करण्याची हिंमत केली.
इतर बातम्या-
जुन्या वादातून मित्रांमध्ये राडा, नागपुरात चौघांकडून तरुणाची चाकू भोसकून हत्या
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मेव्हण्याच्या मित्राची हत्या, SRPF जवान ऊसाच्या शेतात सापडला