जालना | 2 सप्टेंबर 2023 : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये आज बंद पाळण्यात येणार आहे. या घटनेचे आजही पडसाद उमटत आहे. धुळ्यात जाळपोळीमुळे वाहतूक कोंडी झाली. तर औरंगाबादमध्येही सकाळीच आंदोलकांनी जाळपोळ करून निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे जालन्यात जाणार असून मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत.
जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेनंतर मध्यरात्रीही जाळपोळ सुरूच होती. औरंगाबादच्या सिडको बसस्थानकात बस पेटवण्यात आली आहे. शहागड बसस्थानकात चार ते पाच बसेसला आग लावण्यात आली आहे. बसला आग लावल्याचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहे. लाठीचार्ज नंतर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
जालन्यातील लाठीचार्जचा निषेध म्हणून मराठा आंदोलकांनी जालन्यासह नंदूरबार, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच अनेक तालुक्यातील कारभारही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे अडीच वाजताच आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या 8 सप्टेंबरमध्ये जालन्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला अडचण आली असती म्हणून हे आंदोलन दडपण्यात आले, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. गृह विभागाकडुन आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो, जालन्यातील आंदोलन पोलीस प्रशासनामुळे चिघळले, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज जालन्याला जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. शरद पवार मुंबईतून जालन्याकडे जाणार आहेत. तसेच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा आज जालन्याला रवाना होणार आहेत. उदयनराजे भोसले पुण्यातून जालन्याला जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत.