कोळसा टंचाईसाठी राज्य सरकारच दोषी, मुबलक कोळसा असताना राज्यानेच साठा उचलला नाही, रावसाहेब दानवे यांचा आरोप
राज्य सरकारने कोळसा उचलू शकत नाही, असे कळवले होते. त्यामुळेच ही टंचाई निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी रावसाहेब दानवे यांनी दिले.
औरंगाबाद: कोळशाचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे राज्यभरात कोळशाची टंचाई (Coal Shortage) निर्माण झाली, असा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. औरंगाबादमधील बुधवारच्या पत्रकारपरिषदेत बोलताना दानवे (Raosaheb Danve) यांनी कोळसा टंचाईसाठी राज्य सरकारच दोषी असल्याचे वक्तव्य केले. मागील पंधरा दिवसांपासून कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्याअभावी वीजनिर्मिती घटली होती, त्यामुळे संपूर्ण राज्यावर भारनियमनाचे संकट घोंगावत होते.
कोळशाअभावी वीजेचा तुटवडा
मागील पंधरा दिवसांत राज्यातील वीजनिर्मिती प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कोळशाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे राज्यात औष्णिक वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती घटली होती. कोळसा टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनावर निशाणा साधून वेळेत कोळसा पुरवठा होत नसल्यासा आरोप केला होता. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, कोळसा टंचाईसाठी राज्य सरकारच दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी होलत होते.
केंद्राने राज्याला पत्र लिहिले होते…
कोळसा टंचाईबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, कोळसा भरपूर आहे. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे कोळशाच्या खदानींमध्ये पाणी साचले. अतिवृष्टीपूर्वी केंद्र सरकारने राज्याला पत्र देऊन कोळसा उचलण्यास सांगितले होते. परंतु राज्य सरकारने कोळसा उचलू शकत नाही, असे कळवले होते. त्यामुळेच ही टंचाई निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले.
मराठवाड्याच्या विकासासाठी राज्यानेही निधी द्यावा
नाशिक, पुणे रेल्वेमार्गांसाठी राज्य सरकार 70% निधी देण्यास तयार आहे. असाच भार औरंगाबाद-चाळीसगाव, औरंगाबाद-नगर-पुणे मार्गासाठीही उचलावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केले. रेल्वे अर्थसंकल्प पूर्वतयारीचा भाग म्हणून नांदेड रेल्वे विभागातील मराठवाडा-विदर्भातील खासदारांची बैठक औरंगाबादेत दानवेंच्या अध्यक्षतेखाली झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस खासदार संजय जाधव, खासदार इम्तियाज जलील, खासदार फौजिया खान यांची उपस्थिती होती.
इतर बातम्या-
औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त बिल्डिंगचा उद्घाटनापूर्वीच वाद, वकील संघाची नाराजी, बहिष्काराचे संकेत