Corona: ओमिक्रॉनचा धसका! औरंगाबाद तालुक्यातील 30 गावात 100 टक्के लसीकरण!
जगभरात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट घोंगावत असताना लसीकरणात पिछाडीवर असलेल्या औरंगाबादमध्येही वेगाने हालचाल सुरु आहे. मागील दोन दिवसात विविध गावांतील लसीकरणात मोठी वाढ झालेली दिसून आली.
औरंगाबादः कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या विषाणूच्या चिंतेने अवघ्या जगाची चिंता वाढवली असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात मात्र यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Vaccination) चांगलाच वेग मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठीचे नियम अधिक कठोर केल्याने विविध गावांमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात औरंगाबाद तालुका आघाडीवर असून सर्वाधिक 30 गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात लसीकरणाची काय आहे स्थिती?
मुख्यमंत्र्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिल्यानंतर मागील 15 दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पातळ्यांवर लसीकरणाला गती मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. लस न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल, डिझेल, रेशन, औषधी, प्रवास, पर्यटन आदी कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत, असे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानंतर सर्वच ठिकाणच्या लसीकरणाला वेग आला. जिल्ह्यात आतापर्यंत 72 टक्के लसीकरण पूर्ण झाले. यात 18.53 लाख पुरुष, 15.21 लाख महिलांचे लसीकरण झाले. यात 18 ते 44 वयोगटात सर्वाधिक 20.43 लाख लोकांनी लस घेतली तर 45 ते 60 वयोगटातील 7.81 लाख लोकांनी लस घेतली. 5.21 लाख जण हे 60 वर्षांवरील लसवंत आहेत. या सर्वांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे.
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळीही लसीकरण
जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठीही जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागात सध्या रबी हंगाम पेरणीसह कापूस वेचणी, मिरची तोडणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश केंद्रावरची लसीकरणाची वेळ बदलून सकाळऐवजी दुपापासून रात्री उशीरापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे कामे आटोपून आलेल्या नागरिकांना ते अधिक सोयीचे झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचाही लसीकरणाला जास्त प्रतिसाद मिळत आहे.
इतर बातम्या-