महालक्ष्मीच्या निमित्तावर जाधववाडीत 100 टन भाज्यांची आवक, 16 भाज्या एकत्र किलोवर विक्रीला, फुलांचे हार 1000 रुपये जोडी
बाजारात मेथीची जुडी 20 रुपये तर पालक, शेपू, कोथिंबीरीची जुडी 15 रुपये जुडी या भावाने विकली फळभाज्यांच्या भावात फार फरक दिसून आला नाही. मात्र 16 एकत्रित केलेल्या भाज्यांचे दर 100 ते 120 रुपये किलो असे होते.
औरंगाबाद: महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक झाली. फुलबाजारही चांगलाच बहरला. (Vegetable and flower market boom in Aurangabad) सोमवारी महालक्ष्मीचे पूजन आणि नैवेद्य दाखवला जातो. या महानैवेद्याला 16 प्रकारच्या भाज्यांना विशेष महत्त्व असते. तसेच ज्येष्ठा-कनिष्ठांसाठी विविध प्रकारचे फुलांचे हार आणि विविधरंगी फुलंही बाजारात आले आहेत.
पावसामुळे भाज्यांच्या वाहतुकीस अडथळे
मागील आठवड्यात शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जाधववाडी अडत बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली होती. रविवारी अडत बाजारात 100 टनांच्या आसपास भाज्या आणल्या गेल्या. गौरींच्या निमित्ताने भाज्यांना जास्त मागणी असल्याने पालेभाजी आणि फळभाज्यांचेही दर काही प्रमामात वाढले होते. बाजारात मेथीची जुडी 20 रुपये तर पालक, शेपू, कोथिंबीरीची जुडी 15 रुपये जुडी या भावाने विकली फळभाज्यांच्या भावात फार फरक दिसून आला नाही. मात्र 16 एकत्रित केलेल्या भाज्यांचे दर 100 ते 120 रुपये किलो असे होते.
फुलांचे हारही 1000 रुपयांपर्यंत जोडी
गणपती आणि महालक्ष्मीच्या काळात फुलांच्या हारांना मोठी मागणी असते. पावसामुळे ऐनवेळी बाजारात फुले कमी आली तर तारांबळ नको म्हणून तसेच गर्दी टाळण्यासाठी अनेक ग्राहकांनी फुलवाल्यांकडे आठ दिवसांपूर्वीच ऑर्डर देऊन ठेवली होती. महालक्ष्मीसाठीचे खास हार औरंगाबादच्या बाजारात 500 ते 1000 रुपयांपर्यंत विक्रीसाठी होते. दोन तीन दिवस आधी 15 रुपये किलोने विकला जाणारा झेंडू रविवारी 50 रुपये प्रति किलो दराने विकला गेला. तर शेवंती 150 रुपये, निशिगंध 400 रुपये, गलांडा 50 रुपये, मोगरा 600 रुपये प्रति किलो असे दर दिसून आले.
महापूजनाला भाज्या-फुलांचा मान
महालक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी पाना-फुलांची आरास केली जाते. तसेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींच्या केसात शेवंतीची वेळी माळतात. गौरींच्या गळ्यात शोभेल असा मोठा हार, चाफ्याचे फुल, केवड्याचे पानही वाहतात. महानैवेद्याच्या दिवशी ज्येष्ठ गौरीला पुरवणाचा नैवेद्य दाखवला जातो. यात 16 भाज्या, 16 चटण्या, 16 कोशिंबिरी, 16 पक्वान्न तसेच फराळाचे पदार्थ केले जातात. तसेच पुरणाच्या 16 दिवांनी महालक्ष्मीची मोठ्या उत्साहात आरती केली जाते.
इतर बातम्या-