राहुल गांधी यांच्या भारत जोडोपेक्षा पंकजा मुंडे यांची यात्रा मोठी?; शिवशक्ती परिक्रमातून किती किलोमीटरचा प्रवास?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून त्या शक्तीपीठं आणि ज्योतिर्लिंगांना भेट देणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत.
औरंगाबाद | 4 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा आजपासून सुरू झाली आहे. या परिक्रमेच्या माध्यमातून त्या राज्यातील अनेक जिल्ह्यात जाणार आहेत. राज्यातील ज्योर्तिलिंग आणि शक्तीपीठांना त्या भेट देणार आहेत. विशेष म्हणजे त्यांची ही परिक्रमा सर्वात मोठी असणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपेक्षाही पंकजा मुंडे यांची ही मोठी यात्रा असणार आहे. राज्यातील एखाद्या नेत्याने एवढी मोठी यात्रा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडोला जसा महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला होता, तसाच पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेला मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा आजपासून सुरू झाली आहे. 11 सप्टेंबरपर्यंत ही परिक्रमा यात्रा सुरू राहणार आहे. या काळात पंकजा मुंडे तब्बल 12 जिल्ह्यात पायीच जाणार आहेत. सुमारे 5 हजार किलोमीटरचा त्या प्रवास करणार आहेत. यावेळी त्या राज्यातील तीर्थक्षेत्र, ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांना भेटी देणार आहे. हा शक्ती आणि भक्तीचा जागर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रवासा दरम्यान ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील त्या घेणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
कुठे कुठे जाणार
पंकजा मुंडे या आज औरंगाबाद, कोपरगाव, येवला (नाशिक), विंचूर (नाशिक), निफाड (नाशिक), पिंपळगाव बसवंत (नाशिक), जेऊळका (नाशिक), वणी सप्तश्रृंगी गड (नाशिक) दिंडोरी (नाशिक), ढाकांबे (नाशिक) पंचवटी येथे जाणार आहेत.
तर उद्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नांदूर शिंगोटे आणि संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, भोसरी येथे जाणार आहेत.
6 तारखेला पुण्यात सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, दहिवडी, तडवळे, कातर खटाव, एनकूळ, मायणी, विटा, इस्लामपूर, कोल्हापूर येथे त्या जाणार आहेत.
तर 7 तारखेला त्या कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेतील. नंतर सांगली, कवठे महाकाळ, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट आणि करमाळा येथे जाणार आहेत.
8 तारखेला त्या अक्कलकोट, गाणगापूर, आळंद, नळदुर्ग, अनदूर, तुळजापूर येथे जातील. तुळजापूरला त्या तुळजा भवानीचं दर्शन घेणार आहेत.
9 सप्टेंबर रोजी पंकजा मुंडे या धाराशीव येथून परांड्याला जातील. त्यानंतर बार्शी, करमाळा, जामखेड, खर्डा, पाटोदाकडे जातील. तिथून त्या परळी वैजनाथकडे रवाना होतील.
10 तारखेला त्या गंगाखेडला जातील. नंतर परभणी, औंढा नागनाथ, हिंगोली, परभणी आणि परळी वैजनाथकडे जातील.
11 सप्टेंबर रोजी त्या प्रभू वैद्यनाथ मंमदिरात अभिषेक करतील. श्रावणी सोमवार निमित्त परळी वैजनाथ येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला त्या हजेरी लावणार आहेत.
फरक काय?
पंकजा मुंडे आणि राहुल गांधी यांच्या यात्रेत एक मोठा फरक आहे. राहुल गांधी हे भारत जोडोच्या माध्यमातून 136 दिवस 3570 किलोमीटर चालले होते. राहुल गांधी यांची यात्रा पायी यात्रा होती. तर पंकजा मुंडे या 8 दिवस प्रवास करणार आहेत. त्या सुमारे पाच हजार किलोमीटर प्रवास करणार आहे. पण त्यांचा हा प्रवास पायी नसणार आहे. हाच या दोन यात्रेतील मूलभूत फरक आहे. मात्र, असं असलं तरी राज्यात अशा प्रकारची यात्रा काढणाऱ्या त्या एकमेव महिला नेत्या आहेत.
उद्दिष्टेही वेगळे
राहुल गांधी यांनी आपल्या पदयात्रेतून भारत समजून घेण्याचा प्रयत्न केला. देशातील जनतेच्या समस्या समजून घेतल्या. देशाचा मूड समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जनजागरण करणं हाही त्यामागचा हेतू होता. त्यात राहुल गांधी यशस्वीही ठरले आहेत.
पंकजा मुंडे या सुद्धा परिक्रमेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी आणि भक्तांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्याशी हितगूज करणार आहेत. त्यांच्या वेदना समजून घेणार आहेत. मात्र, धार्मिक स्थळांना भेट देण्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे या यात्रेच्या माध्यमातून राजकीय स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी आहे. त्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत. तरीही महाराष्ट्रातील आपलं अस्तित्व अधोरेखित करण्याचा त्यांचा या माध्यमातून प्रयत्न असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
अशी होती राहुल गांधींची पदयात्रा
राहुल गांधी यांची पदयात्रा 136 दिवसांची होती. त्यांनी या काळात 3570 किलोमीटर प्रवास केला. कन्याकुमारी ते काश्मीपर्यंत त्यांची पदयात्रा निघाली. 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून त्यांची यात्रा गेली होती. त्यानंतर श्रीनगरमध्ये त्यांच्या यात्रेची सांगता झाली. याकाळात त्यांनी एकूण 12 सभा, 100 कॉर्नर मिटिंग, 13 पत्रकार परिषदा, 275 वॉकिंग इंटरॅक्शन आणि 100 हून अधिक सिटिंग इंटरॅक्शन त्यांनी केलं होतं.
तिरुवनंतपुरम (केरळ), कोच्चि (केरळ), नीलंबूर (केरळ), म्हैसूर (कर्नाटक), बेल्लारी (कर्नाटक), रायचूर (कर्नाटक), विकराबाद (तेलंगाना), नांदेड (महाराष्ट्र), जळगाव जामोद (महाराष्ट्र), इंदूर (मध्य प्रदेश), कोटा (राजस्थान), दौसा (राजस्थान), अलवर (राजस्थान), बुलंदशहर (उत्तर प्रदेश), दिल्ली, अंबाला (हरियाणा), पठानकोट (पंजाब), जम्मू (जम्मू-कश्मीर) आणि श्रीनगर (जम्मू-कश्मीर) आदी भागात ही यात्रा गेली होती.