Uddhav Thackeray Aurangabad:हे रे काय, मास्क कुठायेत?.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर येताच सगळ्यांना विचारले, आणि मग…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शिवसेना नेत्यांवर किती धाक आहे, हे यातून दिसून आले. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कोरोनाबाबत किती जागरुक आहेत हेही दिसले.
औरंगाबाद – शिवसेनेची मराठवाड्यातील सर्वात मोठी सभा औरंगाबादेत होत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यासपीठावर आल्यावर शिवसेना नेत्यांची थोडी पळापळ झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यासपीठावर दाखल झाल्यावंतर त्यांनी सगळ्यांना विचारले, की मास्क कुठे आहेत, त्यानंतर सगळ्याच नेत्यांनी मास्क पटापट काढले आणि आपल्या तोंडावर लावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शिवसेना नेत्यांवर किती धाक आहे, हे यातून दिसून आले. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कोरोनाबाबत किती जागरुक आहेत हेही दिसले. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या बुधवारी दुप्पट झाली, या पार्श्वभूमीर उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनाच त्यांच्या कृतीतून किती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
सभेच्या व्यासपीठावर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा
औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर करावे, यावरुन गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण तापलेले आहे. अशा स्थितीत औरंगाबादच्या सभेत छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळाच व्यासपीठावर ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर आल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्यालाही नमन केले
एका अवलिया शिवसैनिकाचा सत्कार
यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सहा कोटी ७५ लाख वेळा रामाचे नाव लिहिणाऱ्या अंकुश पवार या शिवसैनिकाचाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी काही जणांनी शिवसेनेतही प्रवेश केला.
औरंगाबादेतील शिवसेनेच्या सभेला मोठी गर्दी
मुंबईपेक्षा जास्त शिवसेनेची विराट सभा औरंगाबादेत पार पडत असल्याचे त्यापूर्वी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. सभा ठिकाणी जागा न पुरल्याने इतर ठिकाणी शिवसैनिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर मराठवाडा कुणाचा, हे दाखवणारी ही सभा असल्याचे यावेळी खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितले.