Nylon Manja: गाडीचा वेग कमी होता, थोडक्यात जीव बचावला, औरंगाबादेत महिलेच्या गळ्याला दुखापत!
नायलॉन मांजा वापरण्यास पोलिसांनी बंदी घातलेली असतानाही औरंगाबादेत याची सर्रास विक्री होत असल्याने नागरिकांना जीवघेण्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. गुलमंडी परिसरात काल बुधवारी असाच एक अपघात घडला.
औरंगाबादः नायलॉन मांजा वापरण्यास पोलिसांनी बंदी घातलेली असतानाही औरंगाबादेत याची सर्रास विक्री होत असल्याने नागरिकांना जीवघेण्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. गुलमंडी परिसरात काल बुधवारी असाच एक अपघात घडला. दुचाकीवरील महिलेच्या गळ्याला या मांजामुळे दुखापत झाली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे केवळ दुखापतीवर हा प्रकार थांबला, नाहीतर महिलेच्या जीवावर बेतले असते.
गुलमंडीतून परतताना अपघात
शुभांगी सुनीव वारद असे या जखमी महिलेचे नाव आहे. त्या क्रांती चौक परिसरात राहतात. बुधवारी गुलमंडीवरील बाजारपेठेत त्या खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्या घरी परतत होत्या. तेव्हा गुलमंडी चौकात अचानक त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजाचा फास बसला. मांजा अत्यंत कडक व त्यावर काचेचे आवरण असल्याने गळ्याजवळ याच्या असह्य वेदना होऊ लागल्या. थोडा वेळ नेमकं काय होतंय, हे त्यांना कळलच नाही.
गाडीचा वेग कमी असल्याने बचावल्या
शुभांगी यांनी स्थानिकांना हा प्रकार सांगितला. नागरिकांनी त्यांच्या गळ्याला अडकलेला मांजा अलगद बाजूला केला. गळ्याला दुखापत झाली होती. गाडीचा वेग कमी असल्यामुळे दुर्घटना टळली. शुभांगी यांच्या पतीला सदर घटनेची कल्पना देण्यात आली. शुभांगी यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांनी घरी पाठवले. दोनच आठवड्यांपूर्वी पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना इशारा दिला होता. काही विक्रेत्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. अनेक नागरिकांच्या गळ्याला यामुळे दुखापती होतात. अनेकांच्या जीवावर बेतल्याचेही प्रकार घडले आहेत. पक्ष्यांनाही ईजा होते.
इतर बातम्या-