Aurangabad Tourism: म्हैसमाळला जाण्याचा रस्ता वर्षभरात दुरुस्त करणार, 19 कोटींचा निधी, तीन वर्षांपासून रखडले काम
म्हैसमाळ हे मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. येथील श्री गिरीजादेवी, बालाजी मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र रस्ते खराब असल्याने पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली होती.
औरंगाबाद: मराठवाड्याचे महाबळेश्वर अशी ख्याती औरंगाबादमधले (Aurangabad tourism) थंड हवेचे ठिकाण म्हणजे म्हैसमाळ. खुलताबाद येथून म्हैसमाळपर्यंत (Khultabad to Mahismal)जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील तीन वर्षांपासून निधीअभावी रखडले आहे. आता मात्र खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या रस्त्याच्या कामासाठी आता पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली आहे. पुढील वर्षात 19 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. या निविदेअंतर्गत म्हैसमाळ घाटमाथ्यापर्यंतचा सहा किलोमीटर रस्ता पूर्ण केला जाणार आहे. यामुळे औरंगाबादमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
निधीअभावी रखडले होते काम
पर्यटन विकास प्राधिकरणाअंतर्गत आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून खुलताबाद ते म्हैसमाळ या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या रस्त्यासाठी 36 कोटी 17 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिकच्या ‘एटीआर’ कंपनीला खुलताबाद ते म्हैसमाळ या 11 किलोीटर रस्त्याचे काम देण्यात आले होते. जुलै 2018 मध्ये या कामाला प्रत्यक्षात सुरुवातदेखील झाली होती. मात्र पुरेसा निधी न मिळाल्याने हे काम अर्धवट राहिले होते. त्यानंतर या कामाला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आले होते. मागील तीन वर्षांच्या काळात दहा कोटी रुपयांत 30 टक्के रस्त्याचे काम करण्यात आले.
आता 19 कोटी रुपयांची नवी निविदा
मागील तीन वर्षांपासून खुलताबाद ते म्हैसमाळ या रस्त्याचे काम रखडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिकच्या एटीआर कंपनीला खुलताबाद ते म्हैसमाळपर्यंतच्या 11 किलोमीटर रस्त्याचे काम देण्यात आले होते. विभागातर्फे एटीआर कंपनीला आधीच्या निधीपैकी नऊ कोटी रुपये देण्यात आले असून अजून एक कोटी रुपये बाकी आहे. आता तीन ऑगस्ट रोजी खुलताबाद ते म्हैसमाळ या सहा किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 19 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून यात घाटाची दुरुस्ती, सिलिंग, पाण्याचा निचरा करण्याची जागा आमि दहा मीटरचा सिमेंट रस्ता आदी कामांचा समावेश आहे. यात 19 कोटींपैकी तब्बल 15 कोटी रुपये घाटातील रस्त्याच्या कामावर खर्च होणार आहे.
मराठवाड्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ
म्हैसमाळ हे मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. येथील गिरीजादेवी, बालाजी मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र रस्ते खराब असल्याने पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली होती.
वाहन चालकांना प्रचंड त्रास
म्हैसमाळचा अनुभव अनेकांसाठी सुखावणारा असला तरीही येथील रस्ता पार करणे पर्यटकांसाठी आव्हान ठरत आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ हा अकरा किलोमीटरचा प्रवास करताना पर्यटकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. पावसामुळे रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. यामुळे येथील पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे.
इतर बातम्या-