‘त्या’ तुफान पावसात रस्त्यावरच्या खड्ड्यात वाहून गेली तरुणी, स्थानिकांचा संताप, औरंगाबादमधली दुःखद घटना
अनेक वर्षांपासून रस्त्यांवर दिवे नाहीत, दुरुस्तीची अनेकदा मागणी करुनही रस्ते कित्येक वर्षे तसेच ठेवले जातात. यामुळेच रुपालीचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला.
औरंगाबाद: शहरात मंगळवारी रात्री झालेली अतिवृष्टी एवढी भयंकर होती की त्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले. त्या रात्री घडलेली आणखी एक दुःखद घटना म्हणजे मुकुंदवाडी परिसरातील तरुणी रस्त्यावरच्या पाणी साठलेल्या खड्ड्यात पडली. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, ती खड्ड्यात पडून 20 फूटांपर्यंत वाहत गेली. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला बाहेर काढून रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.
कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून निघाली
मुकुंदवाडीतील राजनगर येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रुपाली दादाराव गायकवाड या 21 वर्षीय तरुणीचा या घटनेत मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी सात वाजला रुपाली आणि तिची मैत्रीण आम्रपाली या दोघी घरी जाण्यासाठी निघाल्या. पावसामुळे त्यांना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. दरम्यान त्या रात्री मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे भले मोठे लोंढे वाहू लागले होते. आठ वाजता दोघी एकमेकींचा हात धरून जात होत्या. पण कंबरेपर्यंत साठलेल्या पाण्यातून वाट काढताना रुपालीला अंदाज आला नाही. ती रस्त्यावरच्याच एका खोल खड्ड्यात पडली. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की त्यात उलटी पडली. पाहता पाहता 20 फूटांपर्यंत वाहून गेली. हा प्रकार स्थानिक नागरिकांना कळताच त्यांनी तत्काळ तिच्या मदतीसाठी धाव घेतली. रुपालीला पाण्यातून बाहेर काढले गेले. रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
नोकरी करत शिक्षणही सुरु होते
रुपालीला शिक्षणाची खूप आवड होती. घरात आई-वडील, भाऊ, एक मोठी विवाहित बहीण आहे. वडील मिस्त्रीकाम करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरातील आर्थिक स्थिती बिकट होती. रुपालीने नुकतीच बीसीएची पदवी मिळवली होती. तिला अजूनही पुढे शिकायचे होते. पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते. पण घरातील परिस्थितीमुळे तिने चिकलठाण्यातील एका बांधकाम कंपनीत नोकरी सुरु केली होती. मात्र त्या दिवशी रात्रीच्या घटनेत तिचा मृत्यू झाला.
मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे रुपालीचा बळी
सदर घटनेत रुपालीचा मृत्यू झाल्यानंतर रात्री साडेआठनंतर मनपा आणि पोलिसांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांचा संताप झाला. त्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव अमोल पवार, जिल्हा सचिव राहुल निकम आदींनी मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अनेक वर्षांपासून रस्त्यांवर दिवे नाहीत, दुरुस्तीची अनेकदा मागणी करुनही रस्ते कित्येक वर्षे तसेच ठेवले जातात. यामुळेच रुपालीचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला. जमाव अधिकच चिडल्यानंतर दुपारी मनपा अधिकाऱ्यांनी रुपालीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच राजनगर, मुकुंदनगर ते मूर्तिजापूरपर्यंत सिमेंट रस्ता करुन देण्याचे आश्वासन दिले.
इतर बातम्या-
Maharashtra Rain Live Updates | बाम्हणी-वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या तिघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध