औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील 29 वर्षीय तरुण कामगाराने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.शिवनाथ कोलते (Shivnath Sakharam Kolte) असे या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला. यात तो ज्या कंपनीत काम करत होता, त्या कंपनीच्या व्यवस्थापकाला मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील शिवनाथ सखाराम कोलते (29 वर्षे), रा. कविटखेडा, ह.मु. औरंगाबाद या तरुणाने शनिवारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कविटखेडा येथील शिवनाथ कोलते हा वाळून एमआयडीसी येथील नील ऑटो कंपनीत मागील पाच वर्षांपासून कामाला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी तो कविटखेडा येथे आपल्या गावी आला होता. शनिवारी आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यात तो म्हणाला, ‘सॉरी माझ्या मृत्यूस कंपनी व्यवस्थापक मनोज पवार हा कारणीभूत आहे. ‘ या व्हिडिओसोबत तरुणाने सुसाइड नोटही लिहिली. सदर घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळताच पोलिसांनी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शिवनाथला दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडोद बाजार पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि विच्छेदनासाठी डॉक्टरांच्या स्वाधीन केला.
शिवनाथने केलेल्या व्हिडिओतून त्याच्या मृत्यूसाठी कंपनी व्यवस्थापक मनोज पवार जबाबदार आहे, त्यावर गुन्हा दाखल दाखल करून अटक करत नाही, तोपर्यंत शवविस्छेदन करायचे नाही, अशी अट नातेवाईकांनी घातली. पोलिसांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतल्याने असे का केले, असे म्हणत शिवनाथच्या संतप्त नातेवाईकांनी औरंगाबाद-जळगाव महामार्गावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयासमोर दुचाकी आडव्या लावून रास्ता-रोको आंदोलन केले. घटनेची माहिती फुलंब्री पोलीस निरीक्षक अशोक मुदग्गीराज यांना मिळताच ते फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर झाले. नातेवाईकांची समजूत घालून कंपनी व्यवस्थापकाला पोलीस लवकरच ताब्यात घेतील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी रास्ता रोको मागे घेतला. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी मनोज पवारविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शरद पवार हे करीत आहेत. दरम्यान, रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
इतर बातम्या-
मोदीजी, अरिजीतच्या आवाजातील गाण्याची निर्मिती, हीच अखेरची इच्छा, 16 वर्षीय तरुणाची सुसाईड नोट