Exit Poll : मुंबई, कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ, महायुती की मविआ, कोण जास्त जागा जिंकणार?
Axis My India या संस्थेने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांसाठीचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. मराठवाड्यात महायुतीला 30 जागा, तर खान्देशात 38 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुंबईत महायुतीला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महायुतीचा फायदा जाणवत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर येत आहेत. Axis My India चा एक्झिट पोल समोर आला आहे. Axis चा 226 जागांचा एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार, राज्यात महायुती एकहाती सरकार स्थापन करु शकतं. राज्यात महायुतीला 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. या पोलनुसार, महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार आहे. या पोलकडून विभागनिहाय एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. पण तरीदेखील विदर्भाची आकडेवारी अजून जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही मुंबई शहर, ठाणे आणि कोकण, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या 5 विभागांचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आला आहे.
मराठवाड्याचा एक्झिट पोल काय?
Axis My India या संस्थेकडून प्रांतनिहाय एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या पोलनुसार, मराठवाड्यात एकूण 46 विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी 30 जागांवर महायुतीला यश मिळणार आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 15 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर एका जागेवर अपक्ष किंवा बंडखोर जिंकून येण्याची शक्यता आहे.
खान्देशाचा एक्झिट पोल काय?
Axis च्या पोलनुसार, उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खान्देशात विधानसभेच्या एकूण 47 जागा आहेत. यापैकी सर्वाधित जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकून येतील, असा दावा पोलच्या आकडेवारीनुसार करण्यात आला आहे. पोलच्या आकड्यांनुसार, महायुतीला तब्बल 38 जागांवर यश येईल. तर महाविकास आघाडीला केवळ 7 जागांवर यश मिळवता येईल. तर अपक्षांना 2 जागांवर यश मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहराचा एक्झिट पोल काय?
मुंबई शहरात एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 22 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होईल. तर 14 जागांवर महाविकास आघाडीला यश येईल, असा दावा पोलमधून करण्यात आला आहे.
कोकण आणि ठाण्याचा एक्झिट पोल काय?
विशेष म्हणजे कोकण आणि ठाण्याचा देखील एक्झिट पोल अॅक्सिसकडून जाहीर करण्यात आला आहे. पोलनुसार, कोकण आणि ठाण्यात महायुती आणि महाविकास आघाडीत टफ फाईट होण्याची शक्यता आहे. या भागात महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2 ठिकाणी यश मिळू शकतं.
पश्चिम महाराष्ट्रात कुणाच्या जास्त जागा?
विशेष म्हणजे Axis My India कडून पश्चिम महाराष्ट्राचा देखील पोल जाहीर करण्यात आला आहे. या पोलनुसार, पश्चिम महाराष्ट्रात 36 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 21 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहेत. तर इतरांना 1 जागावर यश मिळू शकतं.