बी टीमचा वाद बायकोपर्यंत पोहोचला, अमरावती लोकसभेत शाब्दिक वॉर
अमरावतीत बी टीमचा वाद बायकोपर्यंत पोहोचला आहे. नेमकं काय घडतंय., बी टीमच्या आरोपांवर बच्चू कडूंनी राणांना काय उत्तर दिलं आहे जाणून घ्या.
Amravati Loksabha : कोण कुणाची बी टीम यावरुन अमरावती लोकसभेत शाब्दिक वॉर सुरु आहे. प्रहार संघटना महायुतीत असूनही नवनीत राणांविरोधात बच्चू कडूंनी अमरावतीत उमेदवार उभा केलाय. त्यावरुन बच्चू कडू काँग्रेसची बी टीम असल्याच्या आरोपावर राणांची पत्नी तरी त्यांच्या टीममध्ये आहे का असा सवाल बच्चू कडूंनी विचारला आहे.
राणांसमोर कोणाचे आव्हान
2019 च्या लोकसभेत नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या. मात्र जिंकल्यानंतरच्या महिना-दोन महिन्यातच त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आता 2024 ला भाजपात प्रवेश करुन त्या पुन्हा लोकसभेच्या मैदानात आहेत. राणांविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे, प्रहारचे दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर अशी लढत होऊ शकते.
विशेष म्हणजे बच्चू कडू सत्तेत महायुतीच्या सोबत आहेत. पण त्यांनी अमरावतीत राणांविरोधात उमेदवार दिलाय. रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्षही महायुतीसोबत सत्तेत आहे, पण त्यांच्या पत्नीला भाजप प्रवेशानंतर कमळाच्या चिन्हावर उमेदवारी दिली गेली आहे. याशिवाय रामटेक, अकोला लोकसभेत महायुतीचे घटकपक्ष असलेल्या बच्चू कडूंनी मविआला पाठिंबा देत भाजपला धक्का दिलाय.
जेव्हा काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे शिंदेंचं नेतृत्व मान्य करुन महायुतीत येतील, असा दावा रवी राणांनी केला होता. त्यावर लोकसभेपूर्वी त्यांची पत्नी राणांना सोडून जाण्याचं उत्तर ठाकरेंचे आमदार नितीन देशमुखांनी दिलं होतं.
अमरावती लोकसभेत बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर या ६ विधानसभा येतात. 2019 ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा अपक्ष लढल्या, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते. नवनीता राणांना 5 लाख 10 हजार 947, अडसूळांना 4 लाख 73 हजार 996 मतं पडले होती. नवनीत राणा 36 हजार 951 मतांनी जिंकल्या. त्यांच्या विजयात वंचित आघाडीनं घेतलेल्या 65 हजार 135 मतं महत्वाची ठरली होती.
अमरावती लोकसभेत आमदारांचं संख्याबळ बघितल्यास अमरावती, तिवसा आणि दर्यापूर या 3 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. मेळघाट आणि अचलपूर या 2 ठिकाणी बच्चू कडूंच्या प्रहारचे आमदार आहेत. तर बडनेरात युवा स्वाभिमान अर्थात रवी राणांच्या पक्षाचे एक आमदार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि भाजप यांचा अमरावती लोकसभेत एकही आमदार नाहीय. मात्र बच्चू कडूंनी उमेदवार दिल्यानं अमरावतीची गणितं बदलणार का? बच्चू कडू किंग होणार की किंगमेकर बनवण्यात भूमिका निभावणार. त्याचा फायदा-तोटा कुणाला होणार., हे ४ जूनला निकालावेळी स्पष्ट होणार आहे.