बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, अकोला पोलीस शुभम लोणकरच्या घरी दाखल
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादारी स्वीकारणाऱ्या शुब्बू लोणकर या फेसबुक पेज चालवणाऱ्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे याच प्रकरणाचा तपास करत असताना अकोला पोलील संशयित शुभम लोणकर याच्या घरी दाखल झाले. पण शुभम लोणकरच्या घराला कुलूप लावलेलं बघायला मिळालं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. शुब्बू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक अकाउंटवरुन संबंधित पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. “बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध. आमची कोणासोबतही दुश्मनी नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. आमच्या गँगमधील कोणत्याही भाईला मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही प्रतिक्रिया नक्की देऊ. आम्ही याआधी कधीही वार केलेला नाही. जय श्री राम, जय भारत”, असं संबंधित पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून सुरु आहे, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे.
शुब्बू लोणकर याचं खरं नाव शुभम लोणकर असू शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. शुभम लोणकर लॉरेन्स बिष्णोईच्या जवळचा आहे, असंही कळतंय. शुभम लोणकरला अवैध शस्त्रासह अकोला पोलिसांनी अटक केलेली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संशयित असलेला शुभम लोणकर हा अकोल्याच्या अकोट तालुक्यातील रहिवासी आहे. अकोला पोलीस शुभम लोणकरच्या घरी पोहोचले आहेत. पण घराला कुलूप असल्याची माहिती समोर येत आहे. शुभम लोणकर जून महिन्यापासून इथे राहत नाही, असं पोलसांकडून कळत आहे. शुभम लोणकर सध्या पुण्यात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली. शुब्बू लोणकर महाराष्ट्र नावाच्या फेसबुक पेजवर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या संबंधित पोस्ट व्हायरल केली आहे. आता त्या पोस्टच्या मागे शुब्बू लोणकर जो आहे तोच शुभम लोणकर आहे का किंवा त्यामागे कोण आहे? या सर्व गोष्टींचा तपास मुंबई पोलीस क्राईम ब्रांच करत आहे. या गोष्टीबद्दलचे खुलासे तेच करतील, अशी माहिती अकोला पोलिसांनी दिली.