जरांगे यांची एसआयटी चौकशी लागताच कट्टर विरोधक असलेला ओबीसी नेता मदतीसाठी धावला
जरांगे पाटील कुठल्या भावनेतून बोलले हे माहीत नाही. मात्र आंदोलकांना आता हे लक्षात घ्यावे लागेल की तुमच्या भावना किती दुखावल्या असल्या तरी बोलताना मर्यादा पाळायला पाहिजे. नाहीतर ते आपल्या अंगावर येते. त्यामुळे जरांगे पाटलांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. दिलगिरी व्यक्त करावी लागली.
सुनील ढगे, नागपूर | दि. 28 फेब्रुवारी 2024 : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवरुन जरांगे यांच्यावर टीका होऊ लागली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले. या सर्व प्रकारात मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले. त्यानंतर जरांगे पाटील यांचे विरोधक असलेले आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे मनोज जरांगे यांच्या मदतीसाठी धावले आहेत.
मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध पण…
ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले की, जरांगे पाटील भावनेच्या आहारी जाऊन बोलले आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विषयी जी काही वक्तव्य केली आहेत, ती चुकीचे आहेत. त्यांची ही विधाने फुले, शाहू, आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात कोणताही व्यक्ती सहन होणार नाही. त्यांच्या या वक्तव्यांचा आम्हीही निषेध करतो. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे जरांगे पाटील यांनी जे जे आरोप केले त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले.
जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा सुरुवातीलाच मी निषेध केला आहे. त्यांनी भावनेच्या आहारी जाऊन जे शब्दप्रयोग वापरले होते, हे शब्दप्रयोग एसआयटी चौकशी लावण्याइतके होते का? त्याचा विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे मी एसआयटीचे सुद्धा समर्थन करणार नाही. बबनराव तायवाडे यांनी असे वक्तव्य करीत शासनाच्या एसआयटी चौकशीला विरोध करत मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला. या एसआयटीमधून काय बाहेर येते हे पुढे दिसेल. मराठा आंदोलन जर निष्पक्ष असेल तर त्यातून काही बाहेर पडणार नाही. पण काही विशिष्ट लोकांनी चालवलेले हे आंदोलन असेल तर ते त्यातून बाहेर येईल. त्यातून सत्य काय आणि असत्य काय हे पुढे येईल.
वैयक्तिक टीका करु नका
राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संघटना आंदोलन करतात. त्या आंदोलकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी राज्यात संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यावर तुम्ही सरकार म्हणून टीका करू शकतात. परंतु वैयक्तिक टीका करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे. आंदोलन करत असतात आपल्या मागण्या सरकार पुढे मांडण्याचा पूर्ण अधिकार आंदोलन करणाऱ्यांना आहे. त्या मागण्या मांडत असताना काही बंधने आंदोलकांना पाळावी लागतात. तुमच्या मागण्या संविधानिक असतील तर सरकार त्या मान्य करतात.
जरांगे पाटील यांनीही मर्यादा पाळावी
जरांगे पाटील कुठल्या भावनेतून बोलले हे माहीत नाही. मात्र आंदोलकांना आता हे लक्षात घ्यावे लागेल की तुमच्या भावना किती दुखावल्या असल्या तरी बोलताना मर्यादा पाळायला पाहिजे. नाहीतर ते आपल्या अंगावर येते. त्यामुळे जरांगे पाटलांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. दिलगिरी व्यक्त करावी लागली. आंदोलकांना दिलगिरी व्यक्त करणे किंवा शब्दमागे घेण्याची वेळ यायला नको. एसआयटी चौकशीच्या निर्णयानंतर त्यांचे समर्थक किती सक्षमपणे त्यांच्या पाठिशी उभी राहतात, त्याच्यावरती आंदोलनाचा भविष्य अवलंबून आहे.