बच्चू कडू यांचे पुन्हा खळबळजनक विधान, तर… अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू
मी 350 आंदोलन केली. त्यात माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. मी आमदार असलो तरी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला घेऊन ही सभा कडूलिंबाच्या झाडाखाली होत आहे आणि मी पण कडू आहे हे अधिकाऱ्यांनी विसरू नये.
भंडारा : 27 सप्टेंबर 2023 | वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर यांना जीव गमावावा लागला. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, वन विभागानं त्याची नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळं दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली भंडाऱ्याच्या पवनी इथं प्रहारच्यावतीनं वन विभागावर गदर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार बच्चू कडू यांनी बैलबंडीवर स्वार होऊन मोर्चाचं नेतृत्व केलं. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय.
वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली आहे. 12 ऑक्टोंबरपर्यंत निर्णय घेण्याचं ठरलंय. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात येईल, असं आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी मोर्चेकरी यांना दिलं. गदर मोर्चा वन कार्यालयावर पोहचला तेव्हा तिथं वनाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मी 350 आंदोलन केली. त्यात माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. मी आमदार असलो तरी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला घेऊन ही सभा कडूलिंबाच्या झाडाखाली होत आहे आणि मी पण कडू आहे हे अधिकाऱ्यांनी विसरू नये. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर, आमच्यासारखे नालायक अवलाद नाही, असा धमकीवजा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय.
आम्हाला डुक्कर मारायची परवानगी आहे. पण, ते तुमच्या शेतात आले तर आधी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन सांगा. पण, तोपर्यंत डुक्कर तिथे राहिल का? तो आहे तिथेच त्याला फुकण्याची व्यवस्था झाली पाहिजे. निणर्य घेण्याइतका मी मोठा नाही. हा निर्णय अधिकारी घेऊ शकत नाही. हा निर्णय मंत्री स्तरावर होईल असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
जी शेते जंगलाजवळ आहेत त्या शेताला कुंपण असावेत असा नियम आहे. पण काही अधिकारी ते कुंपण घालू देत नाही. शेतीचे नुकसान झाल्यास 75 टक्के सबसिडी देतो. इथून प्रस्ताव पाठविला आहे पण त्याचा निधी आलेला नाही. कुंपण घालण्याचे टेंडर काढण्याची काही गरज नाही. तसे केलं मंत्रालयमध्ये बसलेले अधिकारी अर्धे पैसे खातील. त्यामुळे शेतकऱ्यानाच परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली.
ज्याला शेती करता येते. एका दाण्याचे शंभर दाणे उभे करू शकतात. तर कुंपण घालणे ही त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही फक्त मंजुरी द्या. मुंबईतला ठेकेदार इथे येईल बसून आणि पैसे घेऊन जाईल असे होता कामा नये. १५ हजारात पूर्ण शेताला आम्ही कुंपण लावू असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. आम्ही तुम्हाला भीक मागत नाही. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास अधिकाऱ्यांना तुडवल्याशिवाय किंवा त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना वापस पाठवू, असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला.