बदलापुरातील हिंसक आंदोलनाबाबत धक्कादायक खुलासा, पोलिसांच्या हाती काय लागले?
बदलापुरातील एका शाळेत दोन लहान मुलींंवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे काल बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. इतकंच नाही तर आंदोलकांनी रेल्वे देखील अडवून धरल्या होत्या. ज्यामुळे बरेच तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पण आता या आंदोलनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही समाजकंठकांचा यामागे हात असल्याचा दावा केला जात आहे.
बदलापूरमध्ये दोन लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्यामुळे मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी अनेक आंदोलक रेल्वे रुळावर उतरले. नंतर आंदोलन इतके वाढत गेले की, तब्बल ८ ते ९ तास रेल्वे सेवा बंद होती. दरम्यान कोणताही तोडगा निघत नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रेल्वे स्थानकावरुन पांगवले. त्यानंतर रेल्वे सेवा सुरु झाली. दुसऱ्या दिवशी ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बदलापुरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. तसेच शाळेतही तोडफोड केली होती.
बदलापुरातील हिंसक आंदोलनाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूरच्या आंदोलनाला कोणतेही नेतृत्व नसले तरी देखील याचा अनेक समाजकंटकांनी फायदा घेतल्याचा मोठा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. हिंसक आंदोलनाच्या मागे कोणाचा हात होता. कोणी या हिंसक आंदोलनाला वाव दिला. याच्या तपासासाठी विशेष पथके नेमली गेली आहेत. आंदोलन करणारे अनेक जण हे बदापुरातील नसून बाहेरुन आल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. पोलिसांकडून फोन कॉल्स तपासले जात आहे.
पीटीआयशी बोलताना डीसीपी सुधाकर पठारे यांनी बुधवारी सांगितले की, निदर्शने आणि त्यानंतरच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बहुतांश शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. बदलापूरमध्ये मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान संतप्त जमावाने दोन अधिकाऱ्यांसह किमान १७ पोलिसांवर दगडफेक केली, त्यात ते जखमी झाले होते.
आदेशांचे उल्लंघन, बेकायदेशीर सभा, हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान इत्यादी आरोपांवरून आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोलिसांनी काही लोकांनी ही ताब्यात घेतले आहे. ज्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. या घटनेची दखल घेत शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि महिला परिचर यांना निलंबित केले आहे. निष्काळजीपणासाठी राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेवर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्थानिक न्यायालयाने बुधवारी आरोपींच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.