बालाजी तांबेंनी कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या तक्रारीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी थेट काठी हातात घेतली! नेमका किस्सा काय?
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते. दरम्यान, तांबे यांच्या आठवणी जागवल्या तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक किस्सा खुद्द तांबे यांनीच सांगितलेला आहे.
मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe passes away) यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते. दरम्यान, तांबे यांच्या आठवणी जागवल्या तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक किस्सा खुद्द तांबे यांनीच सांगितलेला आहे. (A story told by Balaji Tambe about Balasaheb Thackeray)
अन् बाळासाहेबांनी थेट काठी हातात घेतली!
बालाजी तांबे काही वर्षांपूर्वी MTDCच्या बंगल्यात भाड्याने राहत होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तांबे यांच्याकडे मुक्कामी आले होते. तेव्हा बाळासाहेबांना तांबे यांच्या बंगल्याच्या अवतीभोवती कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळालं. मग बाळासाहेबांनी तांबे यांना कारण विचारलं. तेव्हा तांबे यांनी बाळासाहेबांना तिथल्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रार केली. मी इथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते. आम्ही स्वच्छतेवर सगळी लक्ष्मी कमावली आहे. पण इथले कुणी ऐकायलाच तयार नाही.
बालाजी तांबे यांची तक्रार बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकुन घेतली आणि त्यांनी थेट एक काठीच हातात घेतली. बाळासाहेबांना तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं. तेव्हा तांबेंनी त्यांना विचारलं की बाळासाहेब, तुमची युनियन वगैरे आहे का इथे? त्यावर बाळासाहेबांनी हसून उत्तर दिलं की, माझी युनियन तर नाही. पण मी तुम्हाला दाखवतो की, युनियनशिवाय कशी कामं होतात! मग बाळासाहेबांनी तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच झडती घेतली. त्यांना संपूर्ण परिसराची स्वच्छता करायला लावली. मी जाईपर्यंत इथं सगळं हिरवं दिसलं नाही तर या काठीनं एकेकाला दाखवतो, असा शब्दात बाळासाहेबांनी तिथले कर्मचारी स्वच्छतेच्या कामाला लावले, असा एक किस्सा तांबे यांनी सांगितला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
इतर बातम्या :
मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार
A story told by Balaji Tambe about Balasaheb Thackeray