Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!
लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या येण्याची वाट पहात बसायचा. त्यांची एक सभा झाली की, तिथली आमदारकीची सिट लागली, असं गणित असायचं. असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे.
जमलेल्या माझ्या तमाम…हे एकच वाक्य आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे एकच नाव. बस्स, हे उच्चारलं की, काहीही सांगायची गरज नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यांसमोरून त्यांचा जीवनपट एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकून जातो. बाळासाहेबांचा मराठी बाणा, हिंदू धर्म आणि महाराष्ट्राविषयीचं अलोट प्रेम ही त्यांच्या जीवनाची संजीवनी. ही संजीवनी घेऊनच त्यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात मुक्त संचार केला. उरात जपले ते फक्त दोन शब्द. जयहिंद, जय महाराष्ट्र. ते कधीही गोलमालाची भाषा करत नसत. त्यांचं सारं काही एक लोहार की…त्यांची आज 23 जानेवारी रोजी जयंती. त्यानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर ही थोडक्यात टाकलेली एक नजर.
शिवसेना कशी जन्मली?
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे. एकाच नाण्याच्या दोन बाजू. बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926. तो ही पुण्यातला. प्रबोधनकारांचे संस्कार आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या मुशीत ते घडले. सुरुवातीला त्यांनी ‘फ्री प्रेस’ व्यंगचित्रकार म्हणून नोकरी केली. मात्र, त्यानंतर ‘मार्मिक’ सुरू केलं. शिवसेनेच्या जन्माची कहाणी तशी रोचकच. बाळासाहेबांनी त्या काळी मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाची यादी मार्मिकमधून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. हे प्रबोधनकरांनी पाहिलं. ते म्हणाले, ‘याला काही संघटनात्मक आकार देणार की नाही?’ याच प्रश्नातून माणूस आणि हिंदुत्व घेऊन शिवसेना जन्माला आली. 19 जून 1966 रोजी या नव्या संघटनेचा जन्म झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचे ते ‘शिवसेनाप्रमुख’ झाले. त्यानंतर 4 महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांनी शिवाजी पार्कवर पहिला मेळावा घेतला. त्यावेळीही 5 लाख जणांनी गर्दी केली. अन् बाळासाहेब नावानं मुंबईकरांनी, मराठी माणसांवर आपल्या वक्तृत्वानं एक गारूड केलं.
कामगार वर्गावर पकड
राजकीय क्षेत्रात उतरलेल्या बाळासाहेबांनी मायानगरी आणि उद्योनगरी असलेल्या मुंबईतल्या कामगार वर्गाकडं मोर्चा वळवला. त्या काळी या चळवळीवर डावे आणि समाजवादी संघटनांची पकड. या दोन्ही संघटनांना शिवसेनेनं खिळखिळं करून सोडलं. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत आपला पाय रोवला. हळूहळू शिवसेना म्हणजे राडा हे समीकरण रुजू झालं. पण लोक याच्याही प्रेमात पडले. मुंबई, कोकणात शिवसेनेनं जम बसवला. पाहता-पाहता मुंबईच्या महापालिकेत सत्ता काबीज केली. त्यानंतर अनेकांनी शिवसेना सोडली. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे ते थेट राज ठाकरे ही नावं वाढली. मात्र, शिवसेनेची सुरू घौडदौड थांबली नाही. आज बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत. आणि नातू आदित्य ठाकरे तरुण-तडफदार मंत्री म्हणून ओळखले जातात.
युतीचा प्रयोग ते विकासपर्व
बाळासाहेबाचं हिंदुत्व आणि त्यांचे टोकाचे विचार साऱ्यांनाच माहितयत. या हिंदुत्वावरून त्यांनी भाजपशी युती केली. दोन रुपयांत झुणका भाकर, राज्यभर उभारलेली मातोश्री वृद्धाश्रमे, झोपडीवासीयांना मोफत घरे, मुंबईतील उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी अनेक स्वप्ने त्यांनी पाहिली. ती खरीही करून दाखवली. मात्र, ते शेवटपर्यंत स्वतः कसल्याही पदापासून दूर राहिले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक नेते निर्माण केले. कधी कोण्या रिक्षाचालकाला आमदार केले, तर कधी कोण्या साध्या मजुराला तिकीट दिले. मात्र, बाळासाहेबांनी स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही.
हिंदू आत्मघातकी पथके
बाळासाहेबांनी मुंबईतल्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना विरोध केला. त्यांचा मुस्लिमविरोधही तितकाच गाजला. मात्र, ते म्हणत, ‘मुसलमानांना आम्ही मुसलमान म्हणून नव्हे तर या देशाचा एक राष्ट्रवादी नागरिक म्हणून उभा राहिलेला पाहू इच्छितो. प्रथम राष्ट्र आणि मग धर्म ही व्यवहारी समाजवादी विचारधारा आम्ही देऊ इच्छितो’. त्यांची ही भूमिका नेहमीच चर्चेत राहिली. त्यामुळेच बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली, तर त्याचे स्वागतच आहे, असे बाळासाहेब म्हणत. मुंबईतल्या दहशतवादी घटनांनंतर त्यांनी हिंदू आत्मघातकी पथके स्थापन करण्यासाठी दिलेला आदेशही तितकाच वादग्रस्त ठरला.
मतदानाचा हक्क रोखला
जुलै 1999 मध्ये युतीचं सरकार सत्तेवर होतं. त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगानं बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षांसाठी काढून घेतला. निवडणुकीलाही उभं राहण्यास मनाई केली होती. त्यांच्यावर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मतं मागितल्याचा आरोप होता. काँग्रेसचे विलेपार्ले येथील आमदार हंसराज भुग्रा यांचं 1987 मध्ये निधन झालं. या जागेवर पोटनिवडणूक झाली. यावेळी शिवसेनेकडून डॉ. रमेश प्रभू तर काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे हे रिंगणात होते. कुंटे यांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत या निकालाला आव्हान दिलं. कुंटे यांचे नाव त्यावेळी राज्यभरात चर्चेत होतं. त्याविरोधात शिवसेनेनं मुंबईचे तत्कालीन महापौर डॉ रमेश प्रभू यांना मैदानात उतरवलं होतं. त्यावेळी ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन लढलेली पहिली निवडणूक होती. बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हा नारा त्यावेळी दिला होता. बाळासाहेबांनी जाती-धर्माच्या आधारे मतं मागितल्याचा आरोप कुंटे यांनी हायकोर्टात केला. पुढे हा खटला चालला आणि 1999 मध्ये निवडणूक आयोगाने बाळासाहेबांच्या मतदानाच्या अधिकारावर बंदी घातली. 1999 ते 2005 पर्यंत बाळासाहेबांवर मतदान करणं किंवा निवडणूक लढवण्यास बंदी होती. यानंतर दोन वर्षांनी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत 2007 मध्ये तब्बल 8 वर्षांनी बाळासाहेबांनी मतदान केलं.
बाळासाहेबाचं मैत्र…
अभिनेते दिलीप कुमार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर होती. दोघेही अनेकवेळा गप्पांच्या निमित्ताने मातोश्रीवर भेटत. दिलीप कुमार, सुनील दत्त आणि जितेंद्र यांच्यासोबत बाळासाहेब तासनतास गप्पा मारत. मात्र, दिलीप कुमार यांना पाकिस्तानने सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाज पुरस्कार दिला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी तो परत करण्यास बजावलं होतं. बाळासाहेब आणि अमिताभ बच्चन यांचंही खास नातं होतं. 1983 मध्ये जेव्हा कुली सिनेमाच्या सेटवर बिग बी जखमी झाले होते, तेव्हा बाळासाहेब स्वत: त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांनी अभिनेता संजय दत्त, सलमान खान, रीना रॉय यांना हवी ती मदत केली. संजय दत्तवर टाडा अंतर्गत आरोप झाले, त्यावेळी बाळासाहेबांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठीही बाळासाहेब ठाकरे हे वडिलांसमान होते. किंग खान शाहरुखचेही बाळासाहेबांशी चांगले संबंध होते. मात्र, राजकीय मंचावरुन बाळासाहेबांनी शाहरुख खानवर नेहमीच टीका केली. शाहरुखने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेतल्यामुळे बाळासाहेब भडकले होते. दिग्दर्शक राम गोपाल वर्माचेही बाळासाहेब ठाकरेंसोबत चांगले संबंध होते. राम गोपाल वर्मा बाळासाहेबांना रियल सरकार संबोधत.
बाळासाहेबांची अटक
साल 1999. राज्यात आघाडी सत्तेत. मुख्यमंत्री विलासराव देशमुख. उपमुख्यमंत्रीपदी छगन भुजबळ. भुजबळ अन् बाळासाहेबांचे मतभेद सर्वश्रुत. भुजबळ त्यावेळी गृहमंत्रीही होते. ते एका मुलाखतीत म्हणतात, ‘एक दिवस माझ्यासमोर एक फाईल आली. ती होती श्रीकृष्ण आयोगाची. युतीच्या सरकारच्या काळातही ही फाईल. त्यावर काहीही निर्णय झालेला नव्हता. त्यामुळं इकडे आड-तिकडे विहीर अशी माझी अवस्था. त्यामुळं नाईलाजाने सही केली.’ अनेक जणांनी भुजबळांनी संधी साधली, असंही म्हणतात. मात्र, या सहीनं राज्यभर खळबळ उडाली. बाळासाहेबांना अटक करण्यासाठी 500 पोलीस मातोश्रीवर धडकले. तिथून त्यांना महापौर बंगल्यात नेलं. तिथून कोर्टात. मात्र, कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला.
निवृत्त का झाले?
माँसाहेब म्हणजेच मीनाताई ठाकरे आणि बिंदुमाधव ठाकरे. या दोघांचा लवकर जाणं हा बाळासाहेबांवर मोठा आघात होता. तो त्यांनी सहन केला. त्यांच्यावर सिनेमा आला. त्यांच्या अनेक मुलाखती गाजल्या. त्यांची भाषणं ऐकणं म्हणजे पर्वणी असायची. लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या येण्याची वाट पहात बसायचा. त्यांची एक सभा झाली की, तिथली आमदारकीची सिट लागली, असं गणित असायचं. असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ते एकदा म्हणालेले, ‘विजय मर्चंट यांच्याप्रमाणं मला निवृत्त व्हायचंय. लोकांनी निवृत्त का झालात, हा प्रश्न मला विचारलेला आवडेल, पण लोकांनी निवृत्त का होत नाहीत, हे विचारण्याची वेळ माझ्यावर येऊ नये.’ बाळासाहेबांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांचं हे स्मरण….
इतर बातम्याः