बाळासाहेब ठाकरे यांचा एक गुण माझ्यात, दादागिरीपेक्षा ताईगिरी मोठी, सुषमा अंधारे यांचा इशारा कुणाला?
सत्ताधारी चलाख आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी 'सांगा मलिक कुणाचे' यावर चर्चा झाली. पहिल्या एक दोन दिवसांत आरक्षण, शेतीचे नुकसान, गृह खात्याशी संबंधित विषय ललित पाटील प्रकरण याला आमचे प्राधान्य आहे.
नाशिक | 11 डिसेंबर 2023 : ललित पाटील प्रकरणात मी जे मुद्दे मांडले, यावर मी ठाम आहे. दादा भुसे यांना माझा प्रश्न कायम आहे. साधे ब्युटी शॉप उघडण्यासाठी देखील अनेक गोष्टी लागतात, पण ड्रग्ज कारखाना कसा लक्षात आला नाही? जर हे लक्षात आले नाही, तर पालकमंत्री म्हणून तुम्ही अपयशी आहे, नाहीतर तुम्ही ते tolerate का केले? ठाकरे कुटुंबावर ज्यावेळी राणे चिल्ले पिल्ले बोलतात, त्यावेळी आम्ही चिडतो का? मग दादा भुसे यांनी चिडण्याचे कारण काय? असा थेट सवाल ठकारे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. माझ्यात बाळासाहेब ठाकरे यांचा एक गुण नक्की आहे, तो म्हणजे ‘एकदा शब्द सुटला की, ती बंदुकीची गोळी’ असेही त्या म्हणाल्या.
असा कोणता आजार आहे, की एखाद्या आजारासाठी नऊ महिने दवाखान्यात ठेवले जाते? जेलमधून एखाद्याला हलविण्यासाठी प्रोसेस आहे. चौकशी समितीने सांगितलं, की डीन संजीव ठाकूर दोषी आहे, पण संजीव ठाकूर यांना अटक का केली नाही? त्यांची नार्को टेस्ट व्हावी, यावर मी ठाम आहे. पण फक्त ठाकूर यांना अटक केल्याने हे प्रकरण संपत नाही. अनिल जयसिंघानी प्रकरणात तपास का नाही? गृहमंत्री यांची पत्नी जर सुरक्षित नाही, तर ते जनतेला काय सुरक्षित ठेवतील? यावर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे.
ललित पाटील प्रकरणात जे अटक झाले ते सगळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरचे आहे. पण या प्रकरणातील अगोदरच्या घटनांचे काय? या प्रकरणात दोन पार्ट आहे. ललित पाटील हा मातोश्रीवर आला, हे खरं आहे. पण, मातोश्रीवर येण्यासाठी गेट पास असतो. मातोश्रीवर त्याला आणण्यासाठी दादा भुसे यांचा महत्त्वाचा रोल आहे. खासदार हेमंत गोडसे यांचा गर्दीतील फोटो नाही. हा फोटो गणपती दर्शनाचा आहे. ललित पाटील याने कारखाना कसा चालू केला, कुणी कुणी मदत केली याचा देखील तपास झाला पाहिजे. ललित पाटील प्रकरणात सभागृहात चर्चा व्हावी, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्ताधारी चलाख आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी ‘सांगा मलिक कुणाचे’ यावर चर्चा झाली. पहिल्या एक दोन दिवसांत आरक्षण, शेतीचे नुकसान, गृह खात्याशी संबंधित विषय ललित पाटील प्रकरण याला आमचे प्राधान्य आहे. ज्या दिवशी माझ्या हातात कागद असतील, तेव्हा मी याच नाशिकमध्ये येऊन सांगेल आणि ‘डंके की चोट पर’ सांगेन. मी काय ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ असं करत नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
आमच्या त्या भाच्यांमध्ये (राणे बंधू) आणि माझ्यात फरक आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा पालकमंत्री यांना रिपोर्ट करते. ईडीचे कार्यालय मुंबईत आणि ते व्हिडिओ स्पेशालिस्ट (किरीट सोमय्या) कोल्हापूर आणि रत्नागिरी मध्ये जातं, असा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकवण्याचा प्रकार घडला. गोपीचंद पडळकर आणि राऊत यांच्याबाबत जे झालं ते निषेधार्थ आहे. असे थिल्लर चाळे करण्यात भाजपा पटाईत आहे. विदुषकी चाळे करणारे लोक बौद्धिक प्रतिवाद करू शकत नाही. सरकारने उत्तर द्यावं आणि आम्ही विरोधक म्हणून प्रश्न विचारू असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष आपापले दौरे करत आहे. रोहित पवार यांची यात्रा, आदित्य ठाकरे यांची यात्रा आणि मी देखील संवाद साधत आहे. काँग्रेसचे वेगळे काही कार्यक्रम आहे. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लोकाभिमुख कार्यक्रम करत आहोत. जागावाटप चर्चा यथावकाश होईल. उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी, वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी कोंडाळा करण्यात काही अर्थ नाही. महाविकास आघाडीत कुठलही बेबनाव नाही असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.
मनमाडमध्ये जी सभा झाली. त्यात सुहास कांदे यांनी बालिश चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की सुषमा अंधारे काम थांबवेल. पण हा तुमचा भेदरटपणा आहे. त्यांचा प्रयत्न फार काही सफल झाला नाही. दोनशे रुपये भाडोत्री लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सुहास कांदे यांना वाटत असेल, की आपण दादागिरी करू शकतो, तर त्यांनी अजून ताईगिरी बघितली नाही. ताईगिरी ही दादागिरीपेक्षा मोठी आहे. फक्त आम्ही उथळ होत नाही, असा इशारा त्यांनी आमदार सुहास कांदे यांना दिला.