बाळासाहेब युतीतून बाहेर पडणार होते, राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव होता; नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता तयार केली होती. राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्तावही शिवसेनेकडून देण्यात आला होता.
मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता तयार केली होती. राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्तावही शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र काही कारणाने त्यावेळी दोन पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मलिक यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला होता, तसाच त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. दहा वर्षापूर्वीच त्यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता केली होती. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे असा प्रस्ताव होता. परंतु काही कारणामुळे जमले नाही. मात्र 2019मध्ये आघाडीचा निर्णय झाला, असं मलिक म्हणाले.
शिवसेनेला संपवण्यासाठी फडणवीस सक्रिय
दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले. मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत आहेत. पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी 25 वर्ष युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला, असेही त्यांनी सांगितले.
भाजपसोबत शिवसेनेचे खच्चीकरण
2019 च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले. सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे. परंतु आठ वर्षापासून फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते, असा आरोपही त्यांनी केला.
केंद्राकडे ईडी, सीबीआय असली तर आम्ही घाबरत नाही, या अंगावर : संजय राऊतhttps://t.co/WtJzPBUy8r#SanjayRaut | #Shivsena | #UddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 24, 2022
संबंधित बातम्या: