मविआचं स्टेअरिंग जयंत पाटील यांच्याकडे? थोरात म्हणाले, ‘आमचा एकही आमदार फुटणार नाही’
"आमच्यात महत्त्वाची एकच चर्चा आहे, आम्ही 288 जागांचा आढावा केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार हे निश्चितपणे आणि सहजपणे बनत असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. आम्हाला कोणतीच अडचण येणार नाही", असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “आमच्यात महत्त्वाची एकच चर्चा आहे, आम्ही 288 जागांचा आढावा केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार हे निश्चितपणे आणि सहजपणे बनत असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. आम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. आम्हाला जुळवाजुळवीची देखील आवश्यकता येणार नाही. आमच्याबरोबर कुणी आलं तर आम्ही आनंदच मानतो”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
अपक्ष आमदारांसोबत चर्चा झालेली आहे का? असा प्रश्न बाळासाहेब थोपात यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “तशी आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया दिली. आमचं सरकार बनल्यानंतर सर्व येऊन मिळतील. त्यात काही अडचण नाही, असंही थोरात म्हणाले. आमचा नंबर बनला की आम्ही राज्यपालांना लगेच पत्र देऊ”, असं थोरात यांनी सांगितलं.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?
मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “निवडणूक झालेली आहे. उद्या निकाल येईल. महाविकास आघाडीचं सरकार बनवताना त्याबाबत विचार करु. आमच्या दृष्टीने महायुतीचं सरकार सत्तेतून घालवणं याला प्राधान्य आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. “आमचा कुणीही आमदार फुटणार नाही. ती काळजी आम्हाला नाही. आमचा चांगला आकडा बनतोय. आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार आणि सरकार बनवणार”, अशीदेखील प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली.
मविआचं स्टेअरिंग जयंत पाटीव यांच्या हाती?
महाविकास आघाडीत निकालाआधीच मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत ‘ग्रँड हयात’ हॉटेलपासून ‘मातोश्री’ ते ‘सिल्व्हर ओक’पर्यंत महाविकास आघाडीत खलबतं होत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी गाडीचं स्टेअरिंग जयंत पाटील यांच्या हातात होतं. त्यामुळे मविआचं स्टेअरिंग जयंत पाटील यांच्याच हातात जाणार का? अशा चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या. ग्रँड हयात हॉटेलमधील बैठकीनंतर जयंत पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले. ठाकरेंच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जावून शरद पवारांची भेट घेतली.