बाळशास्त्री जांभेकर भाषांतर पुरस्काराची घोषणा, 2019 आणि 2020 सालचा पुरस्कार कुणाला जाहीर?
2019 सालचा बाळशास्त्री जांभेकर भाषांतर पुरस्कार डॉ. मेघा पानसरे यांनी केलेल्या 'सोविएत रशियन कथा' या लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला तर 2020 सालचा पुरस्कार प्रफुल्ल बिडवई लिखित 'भारतातील डाव चळवळींचा मागोवा' या पुस्तकाच्या भाषांतरासाठी मिलिंद चंपानेरकर यांना जाहीर करण्यात येत आहे.
मुंबई : आद्य पत्रकार, अनुवादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे उत्कृष्ट भाषांतरकाराला दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा झालीय. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक गो. वि. उर्फ विंदा करंदीकर यांनी या पुरस्कारासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राला दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी त्यावर्षीच्या प्रकाशनवर्षासह आधीच्या दोन वर्षातील पुस्तकेही विचारात घेतली जातात. यावेळी 2019 आणि 2020 च्या पुरस्कारांची घोषणा आज (23 ऑगस्ट) करण्यात आली. (Balshastri Jambhekar Translation Award will be given to Megha Pansare and Milind Champanerkar)
मध्यंतरीच्या काळातील उद्भवलेल्या कोविडसंकटामुळे 2019 व 2020 या वर्षीसाठीचे पुरस्कार जाहीर करता आले नव्हते. आता या दोन्ही वर्षांतील पुरस्कार एकत्रितपणे आज विंदांच्या जन्मदिनी जाहीर करण्यात येत आहेत. 2019 सालचा बाळशास्त्री जांभेकर भाषांतर पुरस्कार डॉ. मेघा पानसरे यांनी केलेल्या ‘सोविएत रशियन कथा’ या लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला तर 2020 सालचा पुरस्कार प्रफुल्ल बिडवई लिखित ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ या पुस्तकाच्या भाषांतरासाठी मिलिंद चंपानेरकर यांना जाहीर करण्यात येत आहे. रोहन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
‘सोविएत रशियन कथा’ पुस्तकात नेमकं काय?
‘सोविएत रशियन कथा’ या पुस्तकात सुमारे शंभर वर्षांच्या काळातील रशियन कथांची भाषांतरे केलेली आहेत. डॉ. मेघा पानसरे या रशियन भाषेच्या तीस वर्षे अभ्यासक आहेत आणि त्यांनी ही भाषांतरे थेट रशियनमधून केलेली आहेत. संग्रहासाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमी सांगणारी संक्षिप्त प्रस्तावना, प्रत्येक लेखकाचा कथेआधी परिचय आणि रशियन साहित्याचा एकोणिसाव्या शतकापासून समकालीन साहित्याच्या अवस्थेपर्यंतचा विश्लेषक इतिहास सांगणारे परिशिष्ट यांतून जागतिक कथासाहित्याचा अभ्यास करणाऱ्या वा त्यात आस्था असलेल्या मराठी वाचकाला एका भाषेतील कथासाहित्याचा एक पट सापडतो. मूळ भाषेतील लहजा जाणवून देताना लक्ष्य भाषेतील सहजपणा या भाषांतरात साधलेला दिसतो. मराठी भाषा आणि साहित्यासाठी इतर भाषेतील मौलिक ते मराठीत आणून स्वभाषा समृद्ध करण्याचे प्रयत्न एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून अनेक जाणकारांनी कष्टपूर्वक केलेले आहेत. त्या परंपरेतील हे भाषांतर आहे असे वाटते. मेघा पानसरे यांनी वेरा पानोवा यांचे पुस्तक ‘सिर्योझा’, मक्सिम गोर्की यांचे ‘तळघर’ तसेच आत्मजीतसिंह यांचे ‘सारंगी’ हे नाटक भाषांतरित केले आहे.
‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ मध्ये काय?
‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ हा प्रफुल्ल बिडवई लिखित मूळ इंग्रजी ग्रंथ अतिशय साक्षेपाने आणि व्यासंगपूर्ण लिहिलेला असून भारतातील डाव्या विचारांचा ऐतिहासिक आढावा आणि भविष्यातील आव्हानांचे वेधक सूचन यात केलेले आहे. भारतातील डाव्या चळवळीची विश्वासार्ह, माहितीपूर्ण आणि अंतर्दृष्टी देणाऱ्या हे पुस्तक मिलिंद चंपानेरकर यांनी अतिशय सहज भाषेत मराठीत आणल्याने हा एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ मराठीत भाषांतरित झाला आहे. चंपानेरकरांनी यापूर्वी ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घ पत्र’, ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’, ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ या गाजलेल्या पुस्तकांसह अनेक पुस्तके भाषांतरित केलेली आहेत. वरील पुस्तकांची निवड प्रफुल्ल शिलेदार, प्रा. सुनंदा महाजन, प्रा. रणधीर शिंदे व डॉ. नीतीन रिंढे यांच्या समितीने केली.
इतर बातम्या :
साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांच्याकडून मात्र पुरस्कार स्वीकारण्यास नकार, कारण काय?
‘चंद्रपूरमधील दारूबंदी लागू करा, अन्यथा क्रांती दिनी पुरस्कार परत करणार’, पुरस्कार्थींची घोषणा
भारतीय नौदलातील साताऱ्याच्या सुपुत्राचं धाडसी कर्तुत्व, तुफान चक्रीवादळाचा सामना करत 186 मच्छिमारांना वाचवलं
Balshastri Jambhekar Translation Award will be given to Megha Pansare and Milind Champanerkar