Baramati Assembly election : काका आणि पुतण्यात होणार कांटे की टक्कर?
बारामती विधानसभेत शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याची मानली जाते आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून कुणाला तिकीट मिळतं. याची उत्सुकता आहे.
बारामती विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांचं नाव जवळपास फिक्स झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बारामती विधानसभेसाठी इच्छूक म्हणून मुलाखतीला युगेंद्र पवार एकमेव इच्छूक होते. त्यांच्याच नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा बारामती सुरु आहे. तसं झाल्यास लोकसभेला नणंद विरुद्ध भावजईत सामना रंगल्यानंतर विधानसभेला काका अजित पवारांविरुद्ध पुतणे युगेंद्र पवारांमध्ये लढत होऊ शकते. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बारामतीतून कोण लढणार यावर अद्यापही सस्पेन्स आहे.
काही दिवसांपूर्वी समर्थकांनी अजित पवारांची गाडी अडवून त्यांच्या उमेदवारी घोषणेची मागणी केली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांचं नाव बारामतीसाठी घोषितही केलं. पण त्यानंतरही बारामती विधानसभा महायुतीला कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय होईल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
ज्याप्रमाणे अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. त्याचप्रमाणे युगेंद्र पवार अजित पवारांचे पुतणे लागतात. श्रीनिवास पवार आणि अजित पवार हे दोन्ही सख्खे भाऊ. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवारांचे पुत्र आहेत.
मध्यंतरी बारामतीतून अजित पवारांऐवजी त्यांचे पुत्र पार्थ पवार उभे राहतील, अशीही एक चर्चा होती. मात्र अद्याप त्याबद्दल कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही. दरम्यान 1991 पासून जवळपास 33 वर्ष अजित पवार बारातमीचं प्रतिनिधीत्व करत आहेत. 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग ते बारामतीचे आमदार राहिले आहेत.
गेल्या 3 निवडणुकांवर नजर टाकल्यास 2009 ला 1 लाख 2 हजार 797 मतांनी 2014 ला 89 हजार 791 मतांनी आणि 2019 ला विक्रमी मतांनी म्हणजे 1 लाख 65 हजार 265 मतांनी अजित पवार विजयी झाले आहेत.
अजित पवारांनी विजयाची घौडदौड कायम ठेवली असली तरी लोकसभेला मात्र त्यांच्या कुटुंबातल्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. 2019 च्या लोकसभेत मावळातून पूत्र पार्थ पवार 2 लाख 15 हजारांनी आणि 2024 च्या लोकसभेला बारामती लोकसभेतून पत्नी सुनेत्रा पवार 1 लाख 58 हजार मतांनी पराभूत झाल्या.
अजित पवारांचा बारामतीवर प्रचंड वर्चस्व असलं तरी पक्षातली फूट, शरद पवारांनीच उघडलेला मोर्चा आणि लोकसभेचा निकाल या तीन गोष्टींचीही चर्चा आहे. कारण लोकसभेला अजित पवारांच्या बारामती विधानसभेतच सुप्रिया सुळेंना 47 हजार 381 चं लीड मिळालं. त्यामुळे बारामती विधानसभेकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. मात्र उमेदवार कोण हा विषय निघाल्यावर मिश्किलपणे उत्तर देत अजित पवारांनी बारामतीचा सस्पेन्स मात्र वाढवला आहे.