करुणा शर्मा यांचा वाल्मिक कराडबद्दल आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक दावा, धनंजय मुंडेंचे नाव घेत म्हणाल्या….
बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात मारहाण झाल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. कराडला आठवले नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या कोठडीत आहे. वाल्मिक कराडला तुरुंगात मारहाण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानतंर एकच खळबळ उडाली होती. त्यातच आता करुणा शर्मा यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मला ज्याप्रमाणे मारहाण झाली होती, त्याच प्रमाणे वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण झाल्याची माहिती माझ्या सूत्रांनी दिली आहे, असा धक्कादायक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
वाल्मिक कराडला जबर मारहाण
“वाल्मिक कराडला तुरुंगात मारहाण करण्यात आली. त्याची दहशत आता संपली आहे. ज्याप्रमाणे मला मारहाण झाली होती, त्याचप्रमाणे वाल्मिक कराडलाही जेलमध्ये मारहाण झाल्याचे माझ्या सूत्रांनी सांगितले आहे. जेलमध्ये आठवले नावाच्या व्यक्तीने वाल्मिक कराडला जबर मारहाण केली आहे”, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार
“मी बीडमध्ये आल्यानंतर शपथ घेतली होती की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत संपवून टाकेन. पण आता लवकरच मी वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार आहे. त्याने ३२०० लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात पाठवले आणि आता तो स्वतः त्याच तुरुंगात आहे,” असेही करुणा शर्मा म्हणाल्या.
“वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट”
“वाल्मिक कराडला भेटण्यासाठी मी प्रशासनाकडून परवानगी मागणार आहेत. वाल्मिक कराडला बाहेरून जेवण येते. त्याला झोपण्यासाठी पलंगाचीही सोय करण्यात आली आहे. 60 वर्षांचा माणूस जेलमध्ये बसून दहशत पसरवत आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. प्रशासन नेमके काय करत आहे,” असा सवाल करुणा शर्मा यांनी केला आहे.
“वाल्मिक कराडची दहशत संपली”
“माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज काढावे, ज्यात त्यांना सत्य परिस्थिती कळेल. त्यामध्ये सर्व काही समजेल. आता वाल्मिक कराडची दहशत संपली आहे. आज धनंजय मुंडे मंत्री नसतानाही प्रशासन काही कारवाई करत नाही”, असेही करुणा शर्मा यांनी म्हटले.