‘एका पक्षाच्या बळावर सरकार येऊच शकत नाही’, अमित शाह यांच्या स्वबळाच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
अमित शाह यांनी मुंबईत भाजपच्या मेळाव्यात 2029 मध्ये भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणेल, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाच्या बळावर सत्ता येऊच शकत नाही", असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह या दोन दिवसांच्या दौऱ्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानुसार भाजपचा आज मुंबईतील दादर येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय-काय कामे केली पाहिजेत, याबाबत सूचना केली. यावेळी अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं. विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल आणि 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर केवळ भाजपच्या ताकदीवर स्वबळाची सत्ता येईल, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. अमित शाह यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
“जे सरकार काम करतं तेच निवडणूक जिंकतात, आपण केंद्रात सलग तिसरे सरकार बनवले. आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका”, असं अमित शाह आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. “मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार होईल. त्यासाठी जोमात काम करा. यंदा 2024 ला महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचे आहे. यंदा फक्त ऐका, 2024 मध्ये युतीचे सरकार असेल. पण 2029 मध्ये शुद्ध रुपाने कमळचे सरकार असेल”, असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांची प्रतिक्रिया काय?
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यात पोहोचली. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांचं भाषण झालं. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी अजित पवार यांना अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. 1985 नंतर जवळपास 40 वर्षे एका पक्षाचं सरकार कधीचं आलं नाही. इतर राज्यांची आणि महाराष्ट्राची परिस्थितीत वेगळी आहे. भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आजच्या परिस्थितीत एका पक्षावर सरकार येवू शकत नाही. महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांचं मोरल वाढवण्यासाठी, त्या हेतून त्यांनी सांगितलं असेल, मला माहिती नाही. भाजपला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“आज माजलगाव आणि परळीत जनसन्मान यात्रेसाठी आलो. जास्तीत मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करतोय. योजना सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अशा अनेक बाबी आमच्या परीने करत आहोत. आम्ही कुणावरही टीका करत नाही. आम्ही काम करणार आहोत हे आम्ही लोकांना सांगत आहोत. मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. महिलांचा प्रतिसाद, लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मागच्या निवडणुकीत पाहायला मिळाला”, असंदेखील अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
दरम्यान, पत्रकार परिषदेआधी अजित पवार यांनी परळीत भाषण केलं. “मराठवाडा साधू-संतांची भूमी आहे. या भूमीत आज मला यायला मिळालं. देव मला बीड जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी बळ देवो हेच साकडे घालतो. परळी मतदारसंघात, बीड जिल्ह्यात जनता मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसला पसंत करते. सहापैकी चार जागा मतदारांनी निवडून दिल्या होत्या. तुमच्या स्वागताने मी भारावून जातो. मी कधीच तुमचं प्रेम विसरणार नाही हा शब्द आज तुम्हाला देतो. आपलं प्रेम मी विसरणार नाही. धनंजय तुमच्याकरता राबत असतोच”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.