बीडच्या खोक्या भोसलेचा आणखी एक प्रताप, बाप-लेकाला बेदम मारहाण, पीडितांची आपबित्ती ऐकून सरकन येईल काटा
Suresh Khokya Bhosale Crime : बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसलेचा अजून एक कारनामा समोर आला. शिरूर तालुक्यात त्याची मोठी दहशत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. काय आहे हे प्रकरण?

भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा त्यांचाच कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. तर या खोक्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. सतीश भोसले याने शिरूर तालु्क्यातील बाप-लेकाला बेदम मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले. त्याच्या मारहाणीत बापाचा जबडा मोडला आहे. तर मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. शिरूर तालुक्यात खोक्याची मोठी दहशत असल्याचा आरोप या वडील-पुत्रांनी केला आहे. या दोघांची आपबित्ती ऐकून तुमच्या अंगावर शहरे येतील.
हरिणाच्या शिकारातून झाला वाद
या खोक्या भाईला मोर आणि हरिणाच्या मासाची चटक असल्याची चर्चा आहे. त्याने या परिसरातील अनेक वन्य प्राण्यांचा फडशा पाडल्याचा आरोप करण्यात येतो. तो आणि त्याची टोळी अनेक भागात जाळं लावून त्यात प्राणी पकडतो आणि मग त्यावर ही टोळी यथेच्छ ताव मारते. पीडित दिलीप ढाकणे यांचे शिरूर तालुक्यात शेती आहे. या भागात नेहमी हरीण येतात. त्यामुळे खोक्याच्या टोळीने त्यांच्या शेतात जाळे लावले होते. ढाकणे यांना हा प्रकार लक्षात येताच. त्यांनी त्याला विरोध केला. एका जाळ्यात हरीण अडकले होते. त्यामुळे टोळी चिडली. त्यांनी ढाकणे यांना मारहाण केली.




एका फोनवर गाडीभरून खोक्याची माणसं आली
दिलीप ढाकणे यांना मारहाण होताना पाहून त्यांचा मुलगा महेश ढाकणे हा मदतीला धावला. तेव्हा आरोपींनी फोन केला आणि अवघ्या काही मिनिटात स्कॉर्पिओ आणि दुसऱ्या वाहनातून माणसं आली. मग त्यांनी या बापलेकांना बेदम मारहाण केली. लोखंडी रॉडने मारलं. दगडांचा मारा केला. तर दिलीप ढाकणे यांच्या तोंडावर दांड्याने मारलं. त्यामुळे त्यांचा जबडाच हलला. इतकेच नाही तर महेश ढाकणे याला ही बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. जास्त टिवटिव केली तर हातपाय तोडण्याची धमकी आरोपींनी दिली. 19 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.
त्या महिला खोक्याच्या टोळीतील
तर महिलांनी दिलीप आणि महेश ढाकणे यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यावर दोघांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आम्हालाच मारलं आणि आता आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्या महिला खोक्याच्याच टोळीतील असल्याचा आरोप त्यांनी केला. गावकऱ्यांनी बळ दिल्याने खोक्याविरोधात तक्रार दिल्याचे दोघांनी सांगितले. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे आभार पण मानले.