Beed | ऊसतोड कामागारांवर गोळीबार करणारा गुंड 12 तासात पकडला, बीडमध्ये गावठी पिस्तुल, कत्त्या, चाकूसह मुसक्या आवळल्या
माजलगावमध्ये भर दिवसा झालेल्या या गोळीबारानंतर नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. त्यातही आरोपींकडे एवढा शस्त्रसाठा सापडला. त्यामुळे हा साठा घेऊन ते नेमके कुठे जात असावेत, याचेही तर्क वितर्क लावले जात आहेत.
बीडः जिल्ह्यातील माजलगावच्या (Majalgaon) तालखेड इथं दिवसाढवळ्या ऊसतोड मजुरांना मारहाण करून गोळीबार (Firing) करण्याची थरारक घटना सोमवारी घडली. या गोळीबारात निष्पाप रिक्षा चालक जखमी झाला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी (Beed police) 12 तासांच्या आत अटक केली आहे. हे आरोपी कुख्यात असून त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोमवारच्या घटनेत संतप्त जमावाने गोळीबार करणाऱ्या गुंडाला चांगलाच चोप दिला. मात्र त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या गुंडाला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलंय. या गुंडाकडून धारदार शस्त्रांसह गावठी पिस्टल जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.
पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या
या घटनेतील मुख्य आरोपी संतोष गायकवाड याच्याविरोधात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए अंतरग्त कारवाईही केली होती. परंतु डिसेंबर 2021 मध्ये तो बाहेर आला. असे असले तरी माजलगावमधीलच एका 307 च्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. परंतु तो त्यांच्या हाती लागत नव्हता. सोमवारी नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि पुढे पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आरोपी संतोषसह इतर चार साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. ज्या जीपमधून हे साथीदार पळ काढत होते, त्यात गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतूस, दोन कत्त्या, एक चाकू अशी धारदार शस्त्रे होती.
नागरिकांमध्ये दहशत
माजलगावमध्ये भर दिवसा झालेल्या या गोळीबारानंतर नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. त्यातही आरोपींकडे एवढा शस्त्रसाठा सापडला. त्यामुळे हा साठा घेऊन ते नेमके कुठे जात असावेत, याचेही तर्क वितर्क लावले जात आहेत. तसेच या घटनेतील मुख्य आरोपी मागील सहा महिन्यांपासून वाँटेड होता. भर दिवसा गोळीबार करण्याची त्याची हिंमत होते तर पोलिसांचा गुन्हेगारांवर काहीतरी वचक आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.