Santosh Deshmukh Case : ती महिला आहे तरी कोण? मस्साजोगमध्ये ठोकला तळ, कृष्णा आंधळेशी काय संबंध?
Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या झाली होती. या प्रकरणात आरोपी अटकेत आहे तर कृष्णा आंधळे अजून फरार आहे. दरम्यान एका अनोळखी महिलेने कालपासून मस्साजोगमध्ये रात्री तळ ठोकल्याने एकच खळबळ उडाली.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या झाली होती. या प्रकरणात आरोपी अटकेत आहे तर कृष्णा आंधळे अजून फरार आहे. दरम्यान मस्साजोग येथील देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर आढळून आला. ही महिला त्यांच्या घराजवळच ठाण मांडून बसली. तर त्यांच्या घरातच आंघोळ करण्याचा आग्रह करू लागली. त्यामुळे देशमुख कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महिलेचे कृष्णा आंधळे कनेक्शन काय आहे यावर चर्चा सुरू झाली आहे.
कृष्णा आंधळेचे कोणते पुरावे?
मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली. सदरील अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी ६ वाजता देशमुख कुटुंबियांच्या घरासमोरील पॅन्डॉलमध्ये दाखल झाली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा तिने सुरुवातीला केला. मात्र पोलीस आल्यानंतर तिने नाव सांगण्यास देखील नकार दिला. तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशीही मागणी केली. दुसर्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची आहे असा तिचा हट्ट होता.




यानंतर ती देशमुखांचा घराच्या परिसरात बसून राहिली. रात्रभर पॅंडॉलमध्ये झोपली अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली. मात्र सदरील मी महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे.
त्या महिलेचा व्हिडीओ संवाद
या महिलेशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी तिने काही माहिती दिली. ती म्हणाले की, रत्नागिरीवरून आले आहे, धनंजय देशमुख आले की त्यांना मी एक गोष्ट सांगणार आहे रत्नागिरी -कोल्हापूर- पुणे- बारामती – दौंड -जामखेड- अंबाजोगाई – मस्साजोग 30 तासांचा हा असा प्रवास करुन आले आहे. धनंजय देशमुख यांना मला भेटायचं आहे. दमानिया माझ्या खास फ्रेंड, वैभवी देशमुख मला टिव्हीवर दिसते. मला घर आहे दार आहे बंगला आहे सगळं आहे, असा दावा या महिलेने केला.