वाल्मिक कराडच्या पत्नीची मनोज जरांगेंना भावनिक साद, म्हणाल्या, ‘मी सुद्धा मराठा, मलाही न्याय द्या’
वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना भावनिक साद घालत आपल्या पतीसाठी न्याय मागितला. तसेच त्यांनी आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांना मोठा इशारा दिला.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला कोर्टाने आज 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. यानंतर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना भावनिक साद घातली. तसेच त्यांनी भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा उल्लेख करत त्यांची प्रकरणं समोर आणणार असल्याचा इशारा दिला. “वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रेमापोटी आपापल्या परिने आपापल्या ठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. आजची जी घडामोड आहे, तुम्ही ऐकलं असेल, न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास असेल, तर न्यायालयाने सुद्धा त्यांना विचारलं आहे, न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी सुद्धा तपास अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला आहे की, एका फोन कॉलवर तुम्ही कलम 302 गुन्हा कसा दाखल करु शकता? त्यावर तुम्ही मकोका गुन्हा दाखल कसा करुन घेता?”, असं मंजिली कराड म्हणाल्या.
“परवा जो स्टंटचा प्रकार झाला, मी काल ओरडून सांगितलं होतं की, न्यायव्यवस्था कुणाच्या तरी हातामध्ये बळी पडलेली आहे. हे आज जाणवलं आहे. फक्त एका स्टंटमुळे लोकांच्या चुकीच्या मागणीमुळे तुम्ही आज माझ्या माणसाला अडकलं आहे. आम्ही आमच्या न्याय व्यवस्थेनेच चालणार आहेत. तुम्ही कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे समोर येणारच आहे. तुम्ही तुमचा कितीही खेळ केला आहे, कारस्थानं करुन अडकलं आहे, ठिक आहे. तुम्ही अडकवा. जे काही पुरावे असतील, न्याय व्यवस्था न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस बाहेर आल्याशिवाय राहणार नाही”, असं मंजिली कराड म्हणाल्या.
‘संतोष देशमुख सुद्धा माझा बांधव असल्यासारखाच’
“संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे न्याय मागितला. संतोष देशमुख सोबत जो कूकर्म झालं, तो सुद्धा माझा बांधव असल्यासारखाच आहे, त्याच्यासोबत जे कूकर्म झाले त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील जातात. मग मला न्याय कोण देणार? आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झाला आहे. मी सुद्धा समाजाची एक घटक आहे. मी सुद्धा एक महिला आहे. मी महिला म्हणून माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागत आहे. मला न्याय कोण देणार आहे?”, असा सवाल मंजिली कराड यांनी केला.
‘मी माझा न्याय मनोज जरांगे यांच्याकडेच मागते’
“हे जे काही कट कारस्थान रचलं जातंय, जे डावपेच रचून माझ्या पतीला अडकवलं जातंय, ते प्रयत्न करुन तुम्ही माझ्या नवऱ्याला वेठीस धरुन डांबून टाकलं आहे. मग मी माझा न्याय मागायचा कुणाकडे? मी माझा न्याय मनोज जरांगे यांच्याकडेच मागते. तुम्ही जसा मराठा समाज म्हणून तिथे जावून न्याय मागता. मग मी सुद्धा मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. मी सुद्धा मराठा म्हणून माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना आणि वंजारी समाजाच्या दुसऱ्या बांधवाना आवाहन करते की, मला सुद्धा न्याय पाहिजे. आज माय-बहिणीवर अन्याय होत असेल, कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो न्याय मी आज मागत आहे. तो न्याय तुम्ही कसा देणार आहात ते तुम्ही मला सांगावं”, असं मंजिली कराड म्हणाल्या.
कराडवर आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिला इशारा
“जातीवाद करुन, फक्त तुम्ही मराठा समाज म्हणून एकटेच आहेत? संतोष भाऊ एकटेच मराठे आहेत का? मला सुद्धा मराठा समाजाकडे न्याय मागण्याचा अधिकार आहे. मला तो न्याय तुम्ही कसा देणार ते सांगावं. जे काही चाललं ते बंद करा. तुम्ही मीडिया ट्रायल करुन स्टेप बाय स्टेप गोष्टी काढून माझ्या नवऱ्याला अडकवलं. मी सुद्धा ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या एक-एक गोष्टी बाहेर काढल्या त्यांचेसुद्धा एक-एक प्रकरण स्टेप बाय स्टेप सांगत जाईन. त्यांचे काय-काय प्रकरण आहेत ते सुद्धा मी स्टेप बाय स्टेप मीडिया समोर बाहेर काढणार. सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, खासदार बजरंग सोनवणे, अंजली दमानिया यांच्या सुद्धा गोष्टी बाहेर काढेल. त्यांच्या गोष्टीदेखील मी समोर आणल्याशिवाय राहणार नाही. आज सुद्धा बजरंग सोनवणे म्हणाले, परळीला दोन-दोन मंत्रिपद कसे? ही त्यांची पोटदुखी आहे की नाही? या पोटदुखीमुळेच त्यांनी माझ्या नवऱ्याचा वापर करुन बळीचा बकरा केला आणि पूर्ण डांबून टाकलं”, अशी टीका मंजिली कराड यांनी केली.