बीड जिल्हाप्रमुखपदावर कुणाची वर्णी लागणार? मुंबईत कुणाचं वजन जास्त? उत्सुकता शिगेला!
कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडीनंतर त्या पदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईत शिवसेना नेत्यांशी भेटायला गेलेल्या नेत्यांपैकी अनेकांनी आपापल्या नावाची सेटिंग केल्याचीही चर्चा आहे.
बीडः गुटखा विक्री प्रकरणात बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या पदाला शिवसेनाप्रमुखांनी (ShinSena) स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता जिल्हाप्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वरवर सर्व कार्यकर्ते एक दिसत असले तरी काहींनी वरून सेटिंग लावत मुंबईत ठाण मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुटखा जप्त झाल्यानंतर खांडे यांच्यावर कारवाई
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्ष प्रतिमेचा विचार करत शिवसेनेने खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली. त्यानंतर खांडे यांना जामीन मिळाला आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला या प्रकरणाशी संबंध नससल्याचे म्हटले. दरम्यान, तोपर्यंत जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक असलेले नेते मातोश्रीवर पोहोचले होते.
मुंबईत बीडच्या नेत्यांच्या भेटी-गाठी
खांडे यांच्या पदासाठी अनिल जगताप, सचिन मुळूक, परमेश्वर सातपूते, दिलीप गोरे, नितीन धांडे, बप्पा घुगे, हनुमंत जगतापसह अन्य चौघे एकत्र येत त्यांनी मुंबई गाठली. शिवसेना सचिव अनिल देसाई आणि मराठवाडा समन्वयक नेरूरकर यांची भेट घेऊन आमच्यापैकी कुणालाही जिल्हाप्रमुख करा, आम्ही एकच आहोत, असे म्हटल्याचे माध्यमांना सांगण्यात आले. यापैकी अर्धेजण मुंबईतून बीडला परत आले, मात्र उर्वरीत इच्छुकांनी परस्परांची नजर चुकवत नेत्यांच्या भेटी सुरूच ठेवल्या.
कोण कुणाला भेटले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी परमेश्वर सातपुते हे नगराध्यक्ष डॉ. भारभूषण क्षीरसागर यांच्या भेटीला आले होते. सातपुते यांच्यासाठी क्षीरसागर यांनी फिल्डींग लावल्याचे बोलले जात आहे. तर मुंबईतल्या एका नेत्याने जिल्हाप्रमुख पदासाठी अनिल जगताप हे नाव निश्चित झाल्याचे म्हटले आहे. तर कुंडलिक खांडे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचेच नाव पुन्हा जाहीर होणार, असेही म्हटले जात आहे. आता बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर कोण विराजमान होतंय, त्यावरून कोणाचं मुंबईत जास्त वजन आहे, हे सिद्ध होईल.
इतर बातम्या-