अजित पवार यांच्यामुळे भाजप तब्बल 28 जागांवर मागे? भाजपच्या बड्या नेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
भाजप नेत्याच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे विद्यमान आमदार असणाऱ्या तब्बल 28 जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे त्या जागांवर भाजप पिछाडीवर असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे भाजप राज्यात 28 जागांवर पिछाडीवर आहे”, असं मोठं वक्तव्य भाजपचे नेते मोहन जगताप यांनी केलं. “जिथे भाजपचे उमेदवार जिंकतात तिथेच अजित पवार गटाने दावा केला आहे”, असंही मोहन जगताप म्हणाले आहेत. “भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजयल मुंडे कितपत एकत्र आहेत?”, असा सवाल देखील मोहन जगताप यांनी केला आहे. “मला उमेदवारी देत असला तर तुमच्या पक्षात प्रवेश द्या”, अशी विनंती मोहन जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे.
मोहन जगताप काय म्हणाले?
“अजित पवार महायुतीत आल्याने भाजपचं नुकसान होत आहे. ज्या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत तिथे अजित पवार गट दावा करत आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ कामच करायचं का? हे भाजपचं अप्रत्यक्षपणे नुकसानच आहे ना? माझ्या माहितीनुसार, अजित पवार गट भाजपच्या 28 जागांवर दावा करत आहे. भाजपच्या या 28 जागा धोक्यात आल्या आहेत”, असं मोहन जगताप म्हणाले.
यावेळी मोहन जगताप यांना शरद पवार गटातून आपल्याला निमंत्रण आल्याची चर्चा आहे, त्याबाबत काय सांगाल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी देणार असाल तर मला पक्षप्रवेश द्या, असं मोहन जगताप म्हणाले. त्यामुळे मोहन जगताप आता काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमका वाद काय?
विधानसभा निवडणूक आता जसजशी जवळ येत आहे, तसतसं आता जागावाटपावरुन मित्रपक्षांमधील धुसफुस समोर येताना दिसत आहे. आतापर्यंत सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून आमच्यात सारं काही आलबेल आहे, असं सांगितलं जात होतं. पण तरीही अनेक ठिकाणी महायुतीमधील नेत्यांनी बंड पुकारत आपल्याच पक्षाला रामराम ठोकला आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. पण त्यांचं तसं अद्याप फायनल ठरलेलं नाही.
यानंतर आता बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघातही महायुतीत ठिणगी पडताना दिसत आहे. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके किंवा त्यांचा पुतण्या जयसिंग सोळंके यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण या मतदारसंघात भाजपचे नेते मोहन जगताप हे इच्छुक आहेत आणि त्यासाठी ते बंड पुकारण्याच्यादेखील तयारीत आहेत.