बीड | 8 नोव्हेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात जाळपोळ झालेल्या ठिकाणी भेट दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी लोकप्रतिनिधींचे घरे आणि कार्यालय जाळण्यात आले होते. तसेच बीडमधील हॉटेलही जाळण्यात आलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी जाळपोळ झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियी दिली. त्यांनी संबंधित घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच संबंधित घटना पुन्हा घडू नये, यासाठी त्यांनी सर्व समाज आणि नेत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांना मोठा इशारा दिला.
“आंदोलनकर्ते, आरक्षण मागणाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला साजेशी आंदोलने इतिहासात झालेली आहेत. कधी अशी घटना घडली नाही. अशी घटना परत पाहायला लागू नये, अशी माझी सर्वांना विनंती आहे. तुमच्या पेक्षा वेगळी कुणाची भूमिका असेल तर त्याला दहशत वाटावी, याला आंदोलन म्हणता येत नाही. आंदोलनाचं रुपांतर आतंकात नको व्हायला. रस्त्यावर सगळेच यायला लागले तर फार अवघड परिस्थिती होईल”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“मराठा आरक्षणाच्या विषयात केवळ शब्द आणि डेडलाईन घेण्यापेक्षा खरीखुरी चर्चा घडून आली पाहिजे. ज्यांच्याकेड संविधानिक डेटाबेस अशा लोकांकडून चर्चा घडून आली पाहिजे आणि विषय मिटवला पाहिजे. कुणाचंही आरक्षण मारुन कुणी देत नसतं हे नैसर्गिक आहे. संविधानात बसेल तसं आरक्षण दिलं तर टिकेल आणि समाजातील शांतता टिकेल”, असं पंकजा म्हणाल्या.
“मला बीड जिल्ह्याच्या सामान्य जनतेचं कौतुक वाटतं. जेव्हा नेत्यांच्या घरावर हल्ले झाले तेव्हा आजूबाजूला असलेल्या वस्त्यातील सर्व जातीधर्माच्या दलित, मुस्लिम समाजाच्या बांधवांनी मदत करुन त्यांना बाहेर काढलं. हे महाराष्ट्राचं खरं चित्र आहे. हिंसक चित्र पुन्हा दिसू नये, अशी माझी विनंती आहे. कोणत्याही वर्गाला इतकं अस्वस्थ करु नये की त्याचा परिणाम पुढे आपल्याला अनुभवायला मिळेल, आपण कधी विचारही केला नसेल, असा परिणाम होऊ नये, अशी सगळ्यांनी शास्वती घ्यायची गरज आहे. मी या घटनांचा निषेध करते. कोणत्याही जाती, धर्मावर हल्ला होऊ नये”, असं पंकजा म्हणाल्या.
“आरक्षणाच्या लढाईत आपण धाक निर्माण करु शकतो. पण भीती निर्माण होता कामा नये. तरुणाईला अशा गोष्टींकडे वळवल्यास भविष्यात आरक्षण मिळालं तरी सुरक्षित राहणार नाही. तरुणाई अशा ठिकाणी वळू नये याची जबाबदारी नेतृत्वाची आहे. कुणी या तरुणाईचं नेतृत्व स्वीकारलं असेल त्याच्यावर ही जबाबदारी आहे. कुणी एक दिवसात, एक महिन्यात, एक तपात नेता होत असेल त्या सर्वांची याबाबत जबाबदारी आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“आपल्या तरुणाईला अशा हिंसक गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. अशा घटना घडल्या तर नेत्यांनी संवेदना व्यक्त केल्या पाहिजेत. मला वाईट वाटतंय, माझ्या आंदोलनाबाबत असं झालं असतं तर मी क्षमा मागितली असती. अशा गोष्टी नेतेच थांबवू शकतात. असं जो करतोय तो मराठा आरक्षणाला बदनाम करतोय, असं आवाहन करा. अशी घटना पुन्हा घडणार नाही”, असं मत पंकजा यांनी मांडलं.
“फार भयानक घटना झाल्या आहेत. मी वर्णन ऐकलं. तोंडाला मास्क आहे, समोर बॅग लावली आहे, मागे बॅग लावली आहे. पेट्रोलच्या बाटल्या आहेत, पेट्रोलचे बॉम्ब आहेत, अश्रूधुर कसा हातळायचा, जी लोकं आक्रमण करत होते ते वरुन उड्या मारत होते. त्या लोकांसाठी रुग्णवाहिका पाच मिनिटात पोहोचत होती. पण इकडे अग्निशमन दलाची गाडी पोहोचत नव्हती. एवढी प्लॅन करुन ही घटना घडली असेल, त्यांनी ठरवून हे केलं असेल तर यामध्ये गुप्तचर यंत्रणेचं देखील अपयश असल्याचं म्हणता येईल. या घटनेचा तपास व्हायला पाहिजे. जालन्यातील लाठीचार्जचाही तपास व्हायला हवा आणि इथल्याही घटनेचा तपास व्हायला हवा”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
“कुठलाही मोर्चा आणि आंदोलनाचा सूत्रधार असायला नको. सामान्य माणसाला न्याय द्यायचं ध्येय असायला हवं. अशा परत घटना घडल्या तर आम्ही सुद्धा आमरण उपोषण करायला मागेपुढे बघणार नाहीत. महाराष्ट्राचं चित्र सर्व समाज बघेल, अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण आमच्या मनात पाप नाही. आमच्या मनात स्वार्थ नाही. जो वंचित, पीडित आहे, त्याच्या बाजूनेच आमचं नेहमी शक्ती आणि मत राहील. कृपया महाराष्ट्रात पुन्हा अशी वेळ येऊ नये. कारण तुमची डेडलाईन परत संपणार आहे. तेव्हा ती डेडलाईन महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी नसावी. शाळेत जाणाऱ्या मुलामुलींसाठी, सामान्य नोकरी करणाऱ्यांसाठी नसावी, अशी माझी विनंती आहे. सर्व नेत्यांनी आपापल्या समाजाला आवाहन करावी. माणुसकीच्या मार्गाने सर्वांनी काम करावं”, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.
“या आंदोलनाकडे इतर समाजाने बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी हे सर्व घडवलं आहे. इतर समाजाच्या मनात सुप्त अशी ज्वालामुखी तयार होत आहे. याबाबत मला चिंता वाटतेय. कारण मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं, ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते मी करु देणार नाही. कुठेतरी सुप्त लाट तयार करण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही होऊ देणार नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी लाठीचार्ज झालाय. हा लाठीचार्ज नींदणीय होता. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मी केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एक व्यक्ती उपोषण करत असेल, त्यांना संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत असेल, तर अशा व्यक्तीच्या उपोषणस्थळी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यावरही मी निंदा केली. परिक्रम यात्रेनंतर मी अनेक गोष्टी पाहिल्या. पण त्यावर मी भाष्य करणार नाही.”
“लाठीचार्जनंतर सरकारला वेळ दिला जातो. तो वेळ पुरेसा नसल्यामुळे सरकार त्या वेळेत हवा तसा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे सरकार आणखी वेळ मागतं. त्यावेळी उपोषण सोडण्याच्या दिवशी हिंसेच्या घटना घडतात. या घटना अप्रिय आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे. ते त्यांना मिळायलाच हवं. पण जे जन्मानेच मागास आहे, इतर मागासवर्ग आहेत, ज्यांची जीवनातील लढाई शुन्यापासून सुरु होते, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता ते मिळायला पाहिजे याबाबतची सर्व नेत्यांची भूमिका आहे.”
“आतापर्यंतच्या मराठा समाजाच्या नेत्यांनीदेखील तशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे आरक्षण टिकेल, असं दिलं पाहिजे. 16 टक्के आरक्षण दिलं पण ते टिकलं नाही. मग ते किती टक्के दिलं तर टिकेल? यावर विचार केला गेला असता. ओबीसींचं देखील राजकीय आरक्षण संपुष्टात आलं. ओबीसी समाजाने रस्त्यावर येऊन त्याबाबत निदर्शने केली. पण अशा प्रकारचा प्रकार आतापर्यंतच्या इतिहास कुणीही पाहिला नाही. मराठा समाजाच्या सर्व समंजस, संयमी लोकांनादेखील या गोष्टीबाबत प्रिय वाटली नसेल.”