‘मी लै धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलो, माझे व्हिडीओ…’, सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
"खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. हे मी नाही सांगत तर एसआयटी सांगत आहे. आम्ही राजकारणी काहीही बोलू, पण एसआयटी खरं बोलेल ना?", असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आरोपी वाल्मिक कराड यालादेखील आरोपी करण्यात आलं आहे. तसेच त्याच्यावर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कराड यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कराडच्या समर्थकांनी या विरोधात परळीत बंद पुकारला. ठिकठिकाणी आंदोलने केली. वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी तर परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मंजिली कराड यांनी काल पत्रकार परिषद घेतली तेव्हा भाजप आमदार सुरेश धस यांना मोठं चॅलेंज दिलं. आपल्या पतीचे प्रकरण उकरुन काढणाऱ्यांची देखील प्रकरण उकरुन काढू, असा इशारा मंजिली कराड यांनी काल दिला. यानंतर आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“आका जो आहे तो सोपा आका नाही. या आकाकडे 17 मोबाईल होते. तुम्ही आता नाविन्यपूर्ण योजना सांगितली की, तो अमेरिकेहून धमकी देत होता. अमेरिकेचे सीम वापरत असेल. तो वापरत असेल. आका काय काय नाही करु शकत, आकाचा बाका 50-50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता”, असा दावा सुरेश धस यांनी केला.
‘लै धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलो’
“हे बघा मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे. ती माझी भगिनी आहे. माझ्या भगिनी केलेल्या आरोपांवर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावर आरोप करावेत. व्हिडीओ, हे आणि ते, अरे कुठेच काही सापडू शकत नाही. लै धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे. माझे काही व्हिडीओ सापडणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी मंजिली कराड यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिली. तसेच “एखाद्या पुरुषाने आरोप केले तर त्याला उत्तर देईन. आका आला तरी त्याला उत्तर देईन”, असंही सुरेश धस म्हणाले.
सुरेश धस यांचा वाल्मिक कराडच्या समर्थकांवर निशाणा
“समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही. सोशल मीडियावर रिल्सवर जे पोरं आहेत, ज्यांचा ऑलरेडी या लोकांमुळे वाटोळं होऊन बसलेलं आहे, या पोरांनी पुस्तकं हाती घ्यायचा ऐवजी, अभ्यास हाती घ्यायच्या ऐवजी, नको त्या लोकांचे रिल्स बघत बसले आहेत. ते रिल्स बघण्याचा एक नवी अॅटम तयार झालेला आहे. त्यातील हे पोरं आहेत, बाकी काही नाही”, अशी टीका सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या समर्थकांवर केली.
‘खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या’
“खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. हे मी नाही सांगत तर एसआयटी सांगत आहे. आम्ही राजकारणी काहीही बोलू, पण एसआयटी खरं बोलेल ना? एसआयटीच्या रिमांड अर्जात हेच म्हटलं आहे की, खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवलं”, असं सुरेश धस म्हणाले.
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया
“सैफ अली खानच्या घरी आरोपी चोरी करायला आला होता वाटतं. तुम्ही हिरो आणि हिरॉईनला जास्त डिमांड देता. आमच्याकडे काही एवढं नाही. अहो, संभाजीनगरमध्ये काल-परवा एका तरुणाचा जागेवर मर्डर झालाय, तुमच्याकडे बातमी सुद्धा नाही. कॉलेजच्या पोराचा मर्डर झालाय”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.