Suresh Dhas | ‘आदिवासी पारधी महिलेवरील अत्याचाराचे आरोप खोटे’, सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
बीडमध्ये संतापजनक प्रकार समोर आलाय. एका आदिवासी पारधी समाजाच्या महिलेला जमिनीच्या वादातून निर्वस्त्र करत मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हाही दाखल झालाय.
महेंद्रकुमार मुधोळकर, Tv9 मराठी, बीड | 23 ऑक्टोबर 2023 : बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका आदिवासी महिलेला जमिनीच्या वादावरुन निर्वस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झालाय. त्यापैकी एक आरोपी या भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारावर आमदार सुरेश धस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
“आदिवासी पारधी महिलेवरील अत्याचाराचे आरोप हे खोटे आहेत. जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो चुकीच्या पद्धतीने होत आहे. व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. घटना वेगळी असताना वेगळं रूप देण्याचं काम चालू आहे. व्हिडीओचा क्रम बदलण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मी लेखी मागणी करत आहे”, असं सुरेश धस म्हणाले.
‘व्हिडीओ जाणीवपूर्वक व्हायरल केला जातोय’
“सोशल माध्यमात अनेक बनावट खाते आहेत. त्या माध्यमातून जाणीवपूर्वक तो व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. हे बनावट खाते कोणी तयार केले याचा तपास करावा. या प्रकरणात योग्य तपास करावा. पोलिसांनी यात वेळ घालून तात्काळ योग्य कारवाई करावी”, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
‘माझ्या पत्नीने घटनास्थळी जाऊन विचारपूस केली’
“सदर व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्या आदिवासी महिलेची बदनामी होत आहे. त्यामुळे याबाबत योग्य कारवाई होणं गरजेचं आहे. माझी पत्नी बांधावर गेली होती. त्याआधी हा सगळा बनावट प्रकार तयार करण्यात आला होता. घटना समजल्यावर माझ्या पत्नीने घटनास्थळी जाऊन विचारपूस केली, त्यावेळी आष्टी पोलीस उपस्थित होते”, असं सुरेश धस म्हणाले.
“हे प्रकरण पोलिसांना माहीत आहे. फिर्यादी आष्टी पोलिसात न जाता नगरहून ऑनलाईन तक्रार करतात. फिर्यादी महिला ही निरक्षर आहे. मग तिने ऑनलाइन फिर्याद कशी नोंदवली? यामागे कोणी षडयंत्र करत आहे, म्हणून पोलिसांनी जातीने तपास करावा आणि योग्य ती कारवाई करावी”, अशी मागणी धस यांनी केली.
“मी अनुसूचित जाती-जमाती परिषदेवर काम केले आहे. त्यामुळे मी भावनांचा आदर करतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी असं कसं करू शकले? मला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी”, असं आमदार सुरेश धस म्हणाले.