बीडमध्ये सरपंचाच्या हत्येनंतर हिंसक वळण, आंदोलकांनी बस पेटवली, पोलीस-आंदोलक आमनेसामने
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाल्याने संपूर्ण गाव संतापले आहे. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बीड-लातूर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला हिंसक स्वरूप आले असून, आंदोलकांकडून एक एसटी बस जाळण्यात आली आहे.
पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करुन हत्या केल्याची घटना ताजी असताना काल बीडमध्येदेखील अशाच घटनेची पुनरावृत्ती झालेली बघायला मिळत आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज संपूर्ण मस्साजोग गावच्या नागरिकांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन पुकारलं आहे. सरपंचांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, सरपंचांना न्याय मिळावा या मागणीसाठी मस्साजोग गावचे महिला, मुलं, शाळेचे विद्यार्थी, वृद्ध मंडळी, पुरुष मंडळी असे शेकडो जण रस्त्यावर उतरले आहेत. ग्रामस्थांनी आज सकाळी 9 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन करत बीड-लातूर मार्ग रोखून धरला आहे.
आंदोलक ग्रामस्थांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला असता या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती आहे. केजमध्ये पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले आहेत. आंदोलकांकडून सरपंचांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळपासून रास्ता रोको सुरु आहे. गेल्या 9 तासांपासून आंदोलकांचा रास्ता रोको सुरु आहे. या रास्ता रोको दरम्यान आंदोलकांनी एक एसटी बस पेटवली आहे. आरोपींना पोलीस पकडत नाहीत, योग्य कारवाई करत नाहीत, न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी आंदोलकांची भूमिका आहे. पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी 5 आरोपी फरार असल्याची माहिती आहे. मस्साजोग ग्रामस्थांकडून बीड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु आहे. गेल्या 9 तासांपासून ग्रामस्थांचं आंदोलन सुरु आहे. सरपंचांच्या हत्या प्रकरणी सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाला भेट दिली. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. या दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी एसटी बस पेटवल्याची घटना घडली. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.