बंद दाराआड चर्चा, पंकजा मुंडे यांना भेटताच एकनाथ खडसे यांची भूमिका बदलली
पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास ते पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेनंतर एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अस्वस्थता नाही, असं मत मांडलं.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्ताने खडसे आज बीडमध्ये गेले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा केली. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे खडसेंनी काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपमध्ये अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे, असं म्हटलं होतं. पण आज त्यांनी आपली भूमिका बदलली. पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ नाहीत, असं खडसेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे. तसं मी याआधीदेखील बऱ्याचदा येऊन गेलो आहे. मुंडे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मी आलेलो आहे. पंकजा ताई आणि आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. या कौटुंबिक संबंधांमध्ये एक भावनिक ओलावा आणि प्रेम आहे. त्यामुळे त्यांची भेट घ्यावी असं मला वाटलं म्हणून मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
‘फक्त कौटुंबिक चर्चा’
“आमच्या भेटीत आम्ही अर्धा-पाऊण तास फक्त कौटुंबिक चर्चा केली. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या पलीकडे राजकारणाचा कोणताही विषय झालेला नाही. विनोद तावडे यांनी म्हटलं आहे की, नाथाभाऊंची भाजपला गरज आहे. पण ती मुलाखत मी अजून पाहिलेली नाहीय. मुलाखत पाहिल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
‘पंकजा यांचा हेतूही तसा नव्हता’
“पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येण्याची कोणतीही शक्यता नाही. तसा कुठलाही विषय नाही”, असं खडसेंनी स्पष्ट केलं. “भाजपमध्ये तशी काही परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. पंकजा यांच्या स्टेटमेंटच्या आधीचा आणि नंतरचा भाग दाखवला गेला नाही. त्यामुळे गैरसमज झाला असावा. पण प्रत्यक्ष पंकजा यांचा हेतूही तसा नव्हता”, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
‘पंकजा यांची अस्वस्थता नाही’
“पंकजा बोलल्या आहेत की भाजप फक्त माझा पक्ष नाही. महादेव जानकर दोन-तीन वेळेस तुमचा पक्ष बोलले. त्यावेळी त्या माध्यमातून त्या बोलल्या. त्याचा वेगळा अर्थ काढला गेला”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“मी आज पंकजा ताईंशी चर्चा केली. पण असा कोणताही विषय नाही. माझी कोणतीही अस्वस्थता नाही. जे आहे ते मी सातत्याने काम करत आहे. पक्षाची भूमिका मानलेली आहे. पक्ष सोडणार असं मी म्हटलेली नाहीय, असं त्यांनी सांगितलं”, असंही खडसेंनी सांगितलं.
“बऱ्याचदा शब्दाचा वेगळा अर्थ काढला जातो. पंकजा ताई नाराज आहेत, पक्षामध्ये त्यांना न्याय मिळत नाही, असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तसं होऊ नये”, असं मत खडसेंनी मांडलं.