जंगलातून पायी जात बीडच्या हद्दीतून बाहेर पडले आणि…, बीडच्या सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी फरार कसे झाले?
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तीन आरोपी फरार झाले. ते बीड, संभाजीनगर आणि पुणे असा प्रवास करून गुजरातला गेले. पोलिसांच्या शोधमोहिमेतून त्यांचा हा प्रवास उलगडला. आरोपींनी जंगलमार्गाने बीडच्या हद्दीतून बाहेर पडून ट्रॅव्हल आणि कॅबचा वापर केला. भिवंडीतही त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. अखेर पुण्यातून त्यांना अटक करण्यात आली.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार कसे झाले? याची माहिती आता तपासातून समोर आली आहे. हत्येनंतर बीड, संभाजीनगर, पुणे असा आरोपींचा प्रवास राहिल्याचा तपासातून समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करुन आरोपी बीडच्या वाशी गावातून फरार झाले. पोलीस मागावर असताना आरोपींनी गाड्या किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केला नाही. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी बीडमधून बाहेर जाण्यासाठी जंगलाचा रस्ता निवडला. तीनही आरोपी जवळपास 30 किलोमीटर जंगल-शेतीच्या भागातून पायी चालत बीडच्या हद्दीतून बाहेर पडले. बीड हद्दीतून बाहेर पडताच आरोपींनी हायव्हेवरुन खाजगी ट्रॅव्हेल पकडली.
आरोपींनी प्रत्येकी 1 हजार असे 3 हजार देऊन छत्रपती संभाजीनगर गाठलं. त्यानंतर आरोपींनी छत्रपती संभाजीनगर येथून कॅब बुक केली आणि ते कॅब करुन पुण्यातील भोसरी येथे आले. यानंतर तीनही आरोपी शेअर कारने सुदर्शन घुले याच्या एका मित्राच्या ठिकाणी पोहोचले. आरोपी इथे दीड दिवस थांबले. त्यानंतर त्यांनी गुजरातच्या दिशेला पळ काढला. ते गुजरातमध्ये गिरनारच्या मंदिरात 15 दिवस थांबले. या दरम्यान त्यांचे पैसे संपले. त्यामुळे पैशांची व्यवस्था करण्यासाठी मंदिरातून बाहेर पडलेला कृष्णा आंधळे हा तिथे परत आलाच नाही. त्यामुळे शेवटी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे देखील पुण्यात आले. या दरम्यान पोलिसांना त्यांना पुण्याच्या बालेवाडी परिसरातून अटक केली.
भिवंडीत आरोपींनी लपण्याचा प्रयत्न केला पण…
विशेष म्हणजे आरोपींनी भिवंडीत लपण्याचा प्रयत्न केला. यासाठी आरोपींना भिवंडीत एका हॉटेलमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यामध्ये यश आलं नाही. महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ता समाज कल्याण न्याय अध्यक्ष सोन्या पाटील आणि त्यांच्या संघटनेचे सचिव विक्रम डोईफोडे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. बीड तालुक्यात दहापेक्षा जास्त गाव दत्तक असून अनेक गावांमध्ये त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक मदत सुरु असते. तिन्ही आरोपींपैकी एक आरोपी भिवंडी अंजुर फाटा येथील कार्यालयात आला होता. मात्र या वेळेला कार्यालयात उपस्थित असलेल्या सोन्या पाटील यांचा भाऊ जेवंत पाटील याला एक आरोपी भेटला होता. सोन्या पाटील हे आपल्या कार्यालयात नसल्याने त्यांच्या भावाने त्यांचे फोटो काढून बीडमध्ये त्यांचे सचिव विक्रम डोईफोडे यांना पाठवला. मात्र तिथून कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स न मिळाल्याने आणि फोटो पाठवण्याची माहिती आरोपीला मिळाली असता आरोपीने त्या ठिकाणहून पळ काढला. सध्या क्राईम ब्रँच टीमने सोन्या पाटील यांची चौकशी केली असून मदत मागण्यासाठी आलेल्या त्या आरोपीला मदत केली असती तर आम्हीही फसलो असतो, अशी भावना सोन्या पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सोन्या पाटील काय म्हणाले?
“मी अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक काम करत असतो. माझा सचिव विक्रम डोईफोडे हा बीडचा असल्यामुळे त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे, आम्ही बीडमध्ये चांगलं काम करतो. ते आमच्याकडे आले. मी नव्हतो. माझा सचिव पण नव्हता. माझा भाऊ होता. ते चौकशी करून गेले. कुठे गेले ते माहिती नाही. यानंतर बीडमधून क्राईम ब्रँच अधिकारी आमच्याकडे आले होते. माझ्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी आरोपींपैकी एकच जण आला होता. पण मी भेटलो नाही. त्यामुळे तो निघून गेला. फोन आला त्याला ओळखत नाही. मात्र त्याचा फोटो काढला तो आम्ही आज क्राईम ब्रांचला दाखवलेला आहे”, असं सोन्या पाटील यांनी सांगितलं.
“माझं नाव बीडमध्ये असल्यामुळे ते मदत घ्यायला आले. ऑफिसमध्ये ते विचारायला आले तेव्हा माझ्या भावाने त्याचा फोटो काढला आणि आमचे सचिव जे विक्रम आहेत त्यांना तो पाठवला. मात्र त्यांनी तो फोटो वेळेवरती पाहिला नाही. दुसऱ्या दिवशी पाहिला आणि त्यांनी देखील सांगितलं त्यांना ठेवायचं नाही. ते आमच्याकडे राहिलेच नाहीत. यानंतर माझा कुठलाच कॉन्टॅक्ट झाला नाही”, अशी प्रतिक्रिया सोन्या पाटील यांनी दिली.
“क्राईम ब्रांचने आम्हाला विचारलं आम्ही, त्यांना सांगितलं मला काही माहिती नाही. त्यादिवसाची तारीख मला काही सांगता येणार नाही. ती माझ्या भावाला माहितीय मात्र या घटनेच्या तीन-चार दिवसानंतरच आले होते. क्राईम ब्रांचवाले आमच्या सचिवाला घेऊन हॉटेल आणि गोडाऊनमध्ये फिरले. आरोपींकडे पैसे नव्हते. त्यामुळे ते चौकशी करत होते आणि फिरत होते. मदत मागण्याचा हा त्यांचा प्रकार होता. मात्र आम्ही भेटलो नाही”, असं सोन्या पाटील यांनी स्पष्ट केलं. आरोपी हे विक्रम डोईफोडे यांच्या हॉटेलवर गेल्याचंदेखील सोन्या पाटील यांनी सांगितलं.
विक्रम डोईफोडे काय म्हणाले?
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींनी भिवंडीत लपण्याचा प्रयत्न केला. सुदर्शन घुलेसह दोन फरार आरोपींनी हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी भिवंडीतील हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला. हॉटेल मालक वैष्णदेवीला असताना वेटरकडून मालकाला फोन गेला. हॉटेल मालक विक्रम डोईफोडे यांनी याबाबत संपूर्ण माहिती सांगितली.
“माझ्या गावातील व्यक्ती आले असून त्याला हॉटेलमध्ये कामासाठी ठेवून घेण्याची विनंती केली. आरोपींचा फोटोही माझ्या फोनवर पाठवण्यात आला. पण 10 ते 15 मिनिट थांबून आरोपी पळून गेल्याची माहिती आहे. तीनही आरोपी 15 मिनिट हॉटेलमध्ये थाबूंन निघून गेले”, असा दावा हॉटेल मालक विक्रम डोईफोडे यांनी केला. “सोन्या पाटीलचा भाऊ जयवंत पाटीलकडून हॉटेलचा पत्ता घेवून आरोपी आल्याची माहिती आहे”, असाही दावा विक्रम डोईफोडे यांनी केला.