वीजबिल थकल्याने विजपुरवठा खंडित केला; बिडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा गायके असे या 23 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे.
बीड : गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा गायके असे या 23 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने आपल्याच शेतातील झाडाल गळफास घेऊन जीवन संपवले. कृष्णाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने, पाण्याभावी पीक सुकून गेले होते. याच कारणातून त्यांने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
पीक सुकल्याने आत्महत्या
बीड जिल्ह्यात महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे वीजेचे बिल थकले आहे, अशा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. वीज नसल्याने शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. पाण्याभावी पिके सुकून चालल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वीजबिल भरण्यासाठी काही मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे. दरम्यान ऐन पिकांना पाणी देण्याच्या हंगामामध्येच वीजेची थकबाकी असल्याने गायके यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. याच निराशेमधून कृष्णा गायके यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अतिवृष्टीचा पिकांना फटका
अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला, पावसामुळे पीक खराब झाल्याने आपला माल कवडीमोल भावाने विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. यातून कसबसे सावरत शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा केला. मात्र यावेळीही पावसाने पाठ सोडली नाही, अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा पिकाला फटका बसला. अस्मानी संकटांशी सामना करत असताना आता शेतकऱ्यांना सुलतानी संकटांशी देखील सामना कारावा लागत आहे. महावितरणकडून वीजबिल थकलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
संबंधित बातम्या
शाळांबाबत तळ्यात-मळ्यात, निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, टोपेंची माहिती
‘कोरोनाला रोखण्यासाठी जे आवश्यक ते सर्व करा,’ मुख्यमंत्री ठाकरेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश