Beed | महाराष्ट्राचा ‘हिरा’ अनंतात विलीन, साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्राचा बीडचा सुपुत्र पांडुरंग तावरे हे सिक्किमच्या पुरात शहीद झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी काकडहिरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव हळहळताना दिसलं.

बीड | 9 ऑक्टोबर 2023 : सिक्कीममध्ये गेल्या आठवड्यात मध्यरात्री अचानक ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे तिस्ता नदीच्या किनाऱ्यावर असेलील लष्करी छावणी वाहून गेली. अचानक झालेल्या ढगफुटीत लष्कराची वाहने देखील वाहून गेली. तसेच तिस्ता नदीच्या पाणी पातळीत 15 ते 20 फुटांनी वाढ झाली. त्यामुळे नदीलगतचा परिसर पाण्याखाली गेला. अतिशय भयानक असं हे संकट होतं. अचानक झालेल्या पावसामुळे हाहा:कार उडाला. अनेक नागरीक आणि भारतीय सैन्याचे 23 जवान पुरामुळे बेपत्ता झाले. यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र बीडच्या पाटोदा तालुक्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग वामन तावरे यांचादेखील समावेश होता. पांडुरंग तीन दिवस बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.
भारतीय सैन्याकडून पांडुरंग तावरे यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली. पांडुरंग कर्तव्यावर असताना शहीद झाल्याची बातमी समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आई-वडील, पत्नी आणि दोन्ही मुलांनी प्रचंड आक्रोश केला. तावरे यांच्या कुटुंब आणि गावासाठी हा मोठा आघात होता. त्यांचा आक्रोश पाहून संपूर्ण काकडहिरा गाव हळहळलं. घरातल्या कर्त्या पुरुषाचा कर्तव्यावर असताना अशाप्रकारे मृत्यू होणं हे खूप क्लेशदायी आहे, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी गावकरी देखील प्रचंड भावूक झाले.
संपूर्ण गावाचा आक्रोश
पांडुरंग तावरे यांचं पार्थिव आज त्यांचे मूळ गाव काकडहिरा या ठिकाणी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. पांडुरंग यांच्या आई आणि पत्नीचा आक्रोश सुन्न करणारा होता. पांडुरंग यांची मुलं ओक्साबोक्शी रडत होते. यावेळी काही गावकऱ्यांनी मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण मुलं आक्रोश करत होती. मुलांच्या वडिलांचं छत्र हरपलं हे पाहून गावातील इतर महिलांनाही अश्रू अनावर झाले. संपूर्ण गाव रडत होतं.
पांडुरंग यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
पांडुंरंग तावरे यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशितील हजारो नागरीक आले होते. या सर्वांनी पांडुरंग तावरे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. फुलांचा वर्षावर करत पांडुरंग तावरे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. काही जणांकडून वीर जवान अमर रहे अशा घोषणा केल्या जात होत्या. हजारो नागरीक पांडुरंग यांना नमस्कार करत होते. यानंतर पांडुरंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पांडुरंग यांचे कुटुंबीय, नातेवाईक, गावकऱ्यांनी साश्रू नयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.