Beed Crime : अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या केली, मग दरोड्याचा बनाव रचला; आरोपीला बेड्या
आरोपी दिनेश याने स्वतःला दोरीने बांधून घेत दरोडेखोरांनी ही हत्या केल्याचा बनाव केला. पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके आणि पिंपळनेर पोलिसांनी त्याच्या म्हणण्यानुसार तपास केला, मात्र कुठलाही सुगावा लागला नाही. पोलिसांची नजर मयत ज्योतीच्या दागिन्यांकडे गेली आणि हा दरोडा नसल्याचा विश्वास पोलिसांना पटला.
बीड : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नी (Wife)ची गळा आवळून हत्या (Murder) करत पतीने दरोड्याचा बनाव केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड पोलिसांनी अवघ्या काही तासात घटनेचा छडा लावत आरोपी पती (Husband)ला बेड्या ठोकल्या. ज्योती अबुज असे मयत महिलेचे नाव आहे तर दिनेश अबुज असे आरोपी पतीचे नाव आहे. महिलेला विवस्र करून तिची हत्या करण्यात आली होती. तर पती आणि मुलांना बांधून ठेवण्यात आलं होतं. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. पतीचे दुसरीकडे विवाहबाह्य संबंध सुरु होते. यावरुन पती-पत्नीत वाद सुरु होता. याच वादातून पतीने हे कृत्य केल्याची आरोपीने कबुली दिली.
प्रेमप्रकरण घरात कळल्याने पत्नीला संपवले
आरोपी पती दिनेश अबुज हा एका महिलेच्या प्रेमात पडला होता. याची भनक पत्नी ज्योतीला लागली. एके दिवशी दिनेश झोपल्यानंतर पत्नी ज्योती हिने त्याच्या हाताच्या ठशाच्या माध्यमातून मोबाईल लॉक उघडला आणि संपूर्ण मोबाईलची तपासणी केली. व्हाट्सप चॅटमध्ये एका महिलेसोबतचे चॅट तिने पाहिले. याबाबत सकाळी पतीकडे विचारपूस केल्यानंतर दोघात वाद चिघळला. दररोज याच कारणावरून घरात वाद होऊ लागला. यातूनच काल मध्यरात्रीच्या सुमारास दिनेश याने पत्नीची गळा दाबून हत्या केली.
दरोड्याचा बनाव पोलिसांनी उधळला
आरोपी दिनेश याने स्वतःला दोरीने बांधून घेत दरोडेखोरांनी ही हत्या केल्याचा बनाव केला. पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके आणि पिंपळनेर पोलिसांनी त्याच्या म्हणण्यानुसार तपास केला, मात्र कुठलाही सुगावा लागला नाही. पोलिसांची नजर मयत ज्योतीच्या दागिन्यांकडे गेली आणि हा दरोडा नसल्याचा विश्वास पोलिसांना पटला. दिनेशची कसून चौकशी करताच त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबुल केले. त्यानंतर दिनेशला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके हे करीत आहेत. (In Beed the wife was strangled to death by her husband in an extramarital affair)