‘घरावर हल्ला हा पूर्वनियोजित कट, कुटुंबाला कोंडून मारण्याचा प्रयत्न’, जयदत्त क्षीरसागरांचा गंभीर आरोप
माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या ऑफिस आणि घरावर हल्ला झाला त्यावेळी कसं सामोरं जावं लागलं, या विषयीचा थरार सांगितला. जयदत्त यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी आता पोलिसांकडून तपास सुरु असून सर्व गोष्टी समोर येतील, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय जमावाने हल्ला केला तेव्हा घरात सर्वजण होते. आपलं कुटुंब, ऑफिसमधील कर्मचारी या हल्ल्याला कसे सामोरे गेले यावषियी क्षीरसागर यांनी भाष्य केलं.
बीड | 3 नोव्हेंबर 2023 : माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. बीडमध्ये चार दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी एका जमावाने माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांचं ऑफिस जाळलं होतं. तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर जाळलं होतं. क्षीरसागर कुटुंब हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. असं असताना त्यांच्या घर आणि कार्यालयावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आज जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत काय-काय घडलं, किती नुकसान झालं, याबाबतची माहिती दिली. त्यांनी संपूर्ण घटनेचा थरार सांगितला. तसेच संबंधित घटना घडली तेव्हा आपण बीडमध्ये नव्हतो. पण आपल्या घरात सर्व कुटुंबिय होते, अशी माहिती जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
“या घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. बीडच्या इतिहास हा सर्वधर्म समभाव आणि सर्व जातीधर्माचा आहे. तरीही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने अशी घटना घडणं ही अतिशय दुर्देवी बाब आहे. पोलीस, प्रशासन तपास करेल. त्यावर भाष्य करणं आता योग्य ठरणार नाही. तपासात अनेक गोष्टी निष्पन्न होतील. कोण मास्टरमाईंड आहे. कुठल्या जातीची लोकं आहेत, कुठल्या उद्देशाने आली होती, लोकांना जीवे मारणं, ऑफिस जाळणं हा उद्देश होता का? हे सगळं समोर आलं आहे”, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
‘आज कोण सुरक्षित आहे?’
“अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे सामाजिक सुरक्षेलाच आव्हान देण्यासारखं आहे. आज कोण सुरक्षित आहे? अशा घटना घडत असतील आणि असे पायंडे पडत असतील तर आज कोण सुरक्षित आहे? तर मला वाटतं की ही अतिशय चिंतनीय बाब आहे. प्रशासनाने ही बाब सरकारच्या कानावर टाकली आहे. आता त्यांनी कुमावत साहेब म्हणून अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती केली आहे. सगळ्या गोष्टी समोर येतील, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
‘दोषी गुन्हेगाराला मोकळं सोडणार नाही’
“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या सर्व बातमी गेल्याच होत्या. मी त्यांची भेट घेऊन या सगळ्या गोष्टी विशद केल्या. बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनांवर त्यांनी प्रसारमाध्यमांना देखील प्रतिक्रिया दिलीय. कलम 307 आणि 436 ची कलम जिथे गरज आहे तिथे लावले जातील. कुणाही दोषी गुन्हेगाराला मोकळं सोडणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे आणि ती रास्त आहे”, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
‘ते हात जोडत होते, पण तरीही…’
“मी सर्व माहिती घेतोय. सर्व गोष्टींची पडताळणी करुन त्यातून काय गोष्टी निष्पन्न होतील त्यानंतर सांगेन. माझ्या ऑफिसचं फार नुकसान झालंय. तिथली गाडी जळाली आहे. घरच्या पाच ते सहा गाड्या जळाल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवाला जो धोका होता, घरात जावून मारणं. ऑफिसमध्ये तीन कर्मचारी होते. ते हात जोडत होते तरी त्यांना बाहेर पडू दिलं नाही. शेवटी ते तिथून उड्या मारुन पळाले. त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न झाला”, अशी माहिती जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
‘परिवाराचे एवढे सदस्य घरात असताना हल्ला’
“घरात सर्वजण होते. भूषण, त्याची पत्नी, योगेश, त्याची पत्नी, रवीची मुलं, संदीपची पत्नी, त्याची मुलं, हेमंत ही सर्वजण घरात होते. परिवाराचे एवढे सदस्य घरात असताना जाणीवपूर्वक पेट्रोल बॉम्ब फेकणं, हत्यारं फेकणं, दगड फेकणं आणि त्यांना कोंडून मारणं, हा प्रकार एवढा क्रूर आणि निष्ठूर होता. ब्रिटिशांच्या आणि निजामाच्या काळातही असे प्रकार झाले नाहीत. असा प्रकास बीड शहरात होतो, मला वाटतं सर्व नागरिकांनी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. काय-काय गोष्टी घडतात आणि बाजूला घडतात याबाबत दक्ष राहणं गरजेचं आहे. कितीही कुणीही असला तरी मास्टरमाईंड सोडून काढणं आणि त्यांना नियमाप्रमाणे शिक्षा देणं जरुरीचं आहे”, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.