नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले गालावरून वारं…
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे, धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा असं त्यांनी म्हटलं आहे, त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा, पहिल्या पदावर येऊन धनंजय मुंडे यांच्या हातून समाजाची सेवा घडावी असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
महंत नामदेव शास्त्री काय बोलले याच्यावर मी बोलणार नाही, शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो. ते काहीही बोलले तरी आम्ही बोलणार नाही. परंतु ते पुन्हा पदावर येणे म्हणजे अन्याय अत्याचार त्या जिल्ह्यातल्या लोकांवर सुरू होणे, त्याचे दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील. कारण आत्ताच मंत्रिपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली होती, ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे होते तेव्हा इतकी गुंडगिरी नव्हती. त्यामुळे ते पुन्हा पदावर आले तर आम्ही वस्ताद आहेतच, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, त्या गादीचा आम्ही सन्मान करतो, त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. परंतु त्यांच्या अंगावरून वारं गेलं की गालावरून वारं गेलं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यावर मी बोलणार पण नाही. धनंजय मुंडे पुन्हा पदावर आले तर पुन्हा गुंडगिरी वाढणार, टोळ्या वाढणार आणि पुन्हा लोक मारणार. आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अन्याय अत्याचार होणार.
ज्या ज्या वेळेस मंत्रिपदाचा दुरुपयोग करून गुंडागिरी सुरू झाली, खंडण्या सुरू झाल्या. आणि लोकांच्या हत्या झाल्या, त्यावेळी जिल्ह्यातल्या सर्व समाजातील लोकांचे मन दुखले. त्यांचा विषय मी बोलणं बंद करून टाकलेला आहे, त्याचं कारण म्हणजे आमचेच धड नाहीत, सरकार आणि फडणवीस यांची काही प्रतिनिधी अंधारात काही गोष्टी ठरवत आहेत. त्याचीही संपूर्ण माहिती आम्हाला मिळाली आहे. जर देशमुख कुटुंबावर काही अडचण आली आणि आरोपी सुटले त्यावेळी आम्ही यांना आमचा कचका दाखवून, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.