मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या बीड जिल्हा बंदची हाक
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या 21 सप्टेंबरला बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता बीड जिल्हा बंदची हाक दिली गेलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ केली जावी. हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावे. अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे. यासह इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला बीडमधून पाठिंबा दिला जाणार आहे. दरम्यान उद्याचा बीड बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात वातावरण तापत आहे. बीड जिल्ह्यात याआधी मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेलं बघायला मिळालं होतं. मराठा आंदोलकांच्या आंदोलनावेळी काही जणांनी लोकप्रतिनिधींची घरे आणि कार्यालयांना जाळपोळ केली होती. या घटनेनंतर प्रचंड राजकारण तापलं होतं. यानंतर आता पुन्हा बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापताना दिसत आहे. बीड जिल्ह्यात उद्या पुन्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता पोलिसांवरची जबाबदारी वाढणार आहे.
जरांगे यांच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये रास्ता रोको
दरम्यान, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. तरीही देखील शासनाने दखन न घेतल्याने धाराशिवमधील पाथरूड गावात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाने तातडीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेवून मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांची उपोषणामुळे प्रकृती बिघाडली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अंतरवली सराटीचे गावकरीदेखील भावूक झाले आहेत. गावकऱ्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पण मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणला बसण्याआधी सरकारला इशारा दिला होता. पण राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.