‘एकदा मराठे रस्त्यावर आले तर फडणवीस साहेब…’, मनोज जरांगे यांचा सर्वात मोठा इशारा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर मनोज जरांगे आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहेत. मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये भव्य घोंगडी बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मोठा इशारा दिला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमध्ये आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत सरकारला मोठा इशारा दिला आहे. “जर सरकाने आरक्षण दिलं नाही तर आपला नाईलाज आहे. गरीब मराठ्यांशिवाय यांचं पान हलू शकत नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाची बैठक घ्यायची आहे. पाडायचे की निवडून आणायचे? प्रत्येक मतदारसंघात आपल्याला 70 हजाराची लीड आहे. यांना ती कटणार आहे का? 5 हजारांची लीड यांना कटली नाही. फडणवीस साहेब हिशोब होणार, जातीवादी अधिकारी आणून आम्हाला मारलं तुम्ही त्या अधिकाऱ्यां बढती दिली. लाठीचार्ज आम्ही बघितले. पण फडणवीस यांनी हा हल्ला जाणीवपूर्वक घडवून आणला. काय मिळालं? फडणवीस साहेब, पुन्हा म्हणता मी शिव्या देतो. तुम्ही आमच्या आई-बहिणींवर हत्यार चालवले. मी का शिव्या देऊ नये? मी मराठा समाजाला शांत राहा सांगतो. एकदा जर मराठे रस्त्यावर आले तर फडणवीस तुम्हाला पाय ठेवायला जागा राहणार नाही”, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
“मी नाही होत म्यानेज, मला बदनाम करायच्या टोळ्या उभ्या केल्यात. मात्र फडणवीस साहेब, तुम्ही जेवढे षडयंत्र उभे केले, तेवढे भाजपातले गरीब मराठा पेटून उठले आहेत. भाजपाचे अनेक आमदार आमच्याकडे येऊन गेले आहेत. मी जर नाव सांगितलं तर फडणवीस यांना चक्कर येईल”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. तसेच “पाडायचं की उभे करायचं हे ठरणार आहे. तुम्ही पाडून ताकद दाखवली. आता उभे केले तर निवडून आणून ताकद दाखवा. दारूचा नाद सोडा, तुम्ही दुसऱ्याची फाईल घेऊन येत आहेत, आरक्षण मिळाल्यात जमा आहे, दारू सोडा.जर ठरलं तर उमेदवार कोणी असो त्याला शिक्का मारा, पटत नसलं तरी मतदान करा, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला राजकारणात जायचं आहे”, असं मनोज जरांगे मराठा समाजाला उद्देशून म्हणाले.
‘जे मराठ्यांच्या विरोधात उठले ते आता…’
“मी सांगितलं ओबीसींच्या मुलींना सुद्धा मोफत शिक्षण करा. मी गाव-खेड्यातल्या ओबीसीला आम्ही कधी दुखवलं नाही. तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. जे मराठ्यांच्या विरोधात उठले ते आता येत नसतात. लाडकी बहीण योजना चांगली आहे. फडणवीस यांनी काय नागपूरचं वावर विकून योजना सुरू केली का? लाडक्या बहिणीला योजना दिली, भाच्याचं काय, दाजीच काय, द्या शेकऱ्यांना कर्जमाफी, आता येईल आनंदाचा शिधा, मुंग्यांनी खालेली डाळ”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
“देवेंद्र फडणवीस यांनी गोड बोलून धनगरांचं आरक्षण मोडून काढलं. माझी SIT लावली. फडणवीस यांनी तिकडे 70 हजार वाले चोटे आहेत. त्यांनी तिकडे SIT लावायची. देवेंद्र फडणवीस यांनी जो ट्रॅप रचला, मी मेलो तरी बदलणार नाही. आरक्षण नाही मिळालं तर सरकारचा सुफडा साफ करायचा”, असं मनोज जरांगे यांनी आवाहन केलं.